fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

बंधुतेचा धागा बहुसांस्कृतिक एकतेला बांधणारा – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : “आपण लोकशाहीचे कैवारी कमी आणि मारेकरी जास्त आहोत. त्यामुळे भारतीय लोकशाहीत बंधुतेचा धागा तुटला आहे. या बंधुतेच्या धाग्याची वीण घट्ट करून पुन्हा लोकशाहीला बळ देण्याचे काम बंधुता चळवळ करत आहे. हा धागा जाती-धर्माच्या भिंती ओलांडून बहुसांस्कृतिक एकता निर्माण करणारा आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बंधुता आणि संघर्ष’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात डॉ. सबनीस बोलत होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या नेतृत्वात चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या बंधुता चळवळीचा इतिहास डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी ‘बंधुता आणि संघर्ष’ या ग्रंथात मांडला आह
डेक्कन जिमखाना येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला ललिता सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, प्रकाशक चंद्रकांत वानखेडे, मुख्य संयोजक विजयकुमार मर्लेचा, स्वागताध्यक्ष मधुश्री ओहाळ, प्रशांत रोकडे, शंकर आथरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील १९ व्यक्तींना आणि सहा संस्थांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. डॉ. सबनीस व वानखेडे यांनी रोकडे यांचा सपत्नीक सत्कार केला.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “सर्व जाती-धर्माना बांधणारे हे बंधुतेचे व्यासपीठ आहे. प्रकाश रोकडे यांनी माणसे जोडण्याचे काम केले. वेगवेगळ्या जातीप्रवाहतील दिगग्ज, विद्वान एकत्र आणले. करुणेचा भावनेतून जातीअंताचा लढा करावा, माणसाच्या मनातील जातीची जळमटे काढून टाकावीत, यासाठी हा विचार महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विवेकाची, करुणेची मांडणी त्यांनी केली. विद्रोह संयमाने, विधायक कृतीतून करता येतो, हेही त्यांनी दाखवले. माणसाचे माणूसपण टिकवण्यासाठी आणि विश्वसंस्कृती जोपासण्यासाठी रोकडे यांनी बंधुतेचा विचार पेरला व जगला.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “पोटात भुकेची आग आणि शिक्षणाचा ध्यास घेऊन पुण्यात आलो. शिकलो, नोकरी केली. अर्ध्यावर नोकरी सोडून बंधुतेला वाहून घेतले. सम्यक चळवळ, साक्षरता अभियान, बंधुता चळवळ राबवली. या प्रवासात पुणेकरांचा मोठा वाटा आहे. पुण्यानेच मला घडवले आहे. प्रकाश माझ्या आईवडिलांनी ठेवलेले नाव; पण त्याला जळत ठेवून प्रकाशमान करण्याचे काम तेल-वाती होऊन माझ्या अनेक सहकाऱ्यांनी केले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.”
अशोककुमार पगारिया म्हणाले, “बंधुतेचा विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी रोकडे यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निष्ठेने काम केले. हा ग्रंथ म्हणजे वाचकांना बंधुतेचा दस्तावेज आहे. बंधुतेचा हा विचार प्रेमाचा, आपुलकीचा, करुणेचा विचार आहे. आपण सर्वांनी तो जपला पाहिजे.”
मधुश्री ओव्हाळ यांनी स्वागत केले. चंद्रकांत वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. विजयकुमार मर्लेचा यांनी आभार मानले. 

विद्वानांनी जातीभेद पेरला : डॉ. सबनीस

बदलत्या काळात जातिभेदाचा लढा संपविण्याची चर्चा आपण करतो. मात्र, अनेक विद्वान मंडळी जातीभेद पेरण्याचे काम करतात. ज्या ज्ञानेश्वरांनी बंधुभावासाठी पसायदान मागितले, त्याच ज्ञानेश्वरांना ब्राह्मण म्हणून तिरस्कार करण्याची शिकवण बहुजनांतील विद्वान करतात. ज्ञानोबा-तुकारामाच्या ऐवजी नामदेव तुकाराम करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या मनातील जातीची जळमटे काढण्याचे काम आपल्याला करावे लागेल. महापुरुषांना जातीत अडककवणाऱ्या सडक्या मेंदूची सफाई करण्याचे काम बंधुतेचा विचार करू शकतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading