लोकशिक्षण, लोकसंघटन, जनजागृतीद्वारे प्रबोधनकारांचे रचनात्मक कार्य – प्रा. हरी नरके

पुणे : प्रबोधनकारांनी धर्मचिकित्सा केली तरी ते धर्मविरोधी नव्हते. समाजातील अनिष्ट रूढी-प्रथांविरोधात ते होते. लोकशिक्षण, लोकसंघटन आणि जनजागृती या त्रिसूत्रीतून प्रबोधनकारांनी रचनात्मक कार्य केल्याचे दिसते, असे प्रतिपादन महात्मा फुले वाङमयाचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी केले.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शनिवारी ‘प्रबोधन’ या विषयावर डॉ. नवनाथ शिंदे यांचे व्याख्यान झाले त्या वेळी प्रा. नरके अध्यक्षपदावरून बोलत होते. सुरुवातीस प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील ‘आई थोर तुझे उपकार’ या कथेचे वाचन अभिनेते दीपक रेगे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुरेश राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांचे सुंदर शिल्प साकारले.

प्रा. नरके म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे ध्येयनिष्ठेने काम करीत. स्त्री-पुरूषांमधील विषमता, गरीब-श्रीमंतांमधील दरी, जाती व्यवस्थेवर प्रखर टीका करत प्रबोधनकारांनी मोठे काम उभे केले आहे. महापुरुषांची नावे घेऊन दांभिकपणे सुरू असलेल्या सध्याच्या चळवळींवर नरके यांनी टीका केली. सामाजिक चळवळींचे प्रतिक म्हणून भिडे वाड्याकडे पाहिले जाते. आज या वाड्याची अवस्था अशी झाली आहे की तो कधीही पडू शकतो, अशी अवस्था सध्याच्या सामाजिक चळवळींची झाली आहे.

डॉ. शिंदे म्हणाले, अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्याचे कार्य प्रबोधनकारांनी त्यांच्या विचारातून-साहित्यातून केले आहे. धर्म, संस्कृतीच्या मुखवट्याआडून सर्वसामान्यांची दिशाभूल करणार्‍यांचे वस्त्रहरण प्रबोधनकारांनी केले आहे. त्यांना न्यायाची चाड होती पण अन्यायाविरुद्ध चीड होती.  स्त्री-पुरूष समानतेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. विविध सामाजिक प्रश्नांवर नाटकांद्वारेही प्रबोधन करून परिवर्तनाची मोहीम त्यांनी हाती घेतली होती.

संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, सचिन इटकर, किरण साळी यांनी स्वागत केले. चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: