fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

काळाच्या पुढे विचार करणारे प्रबोधनकार – उर्मिला मातोंडकर

पुणे, दि. २१ – महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला असून हृदयाशी महाराष्ट्र धर्म जोपासला आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक नररत्ने दिली आहेत त्यातील एक प्रबोधनकार ठाकरे होत. प्रबोधनकारांचे स्त्रियांविषयीचे विचार काळाच्या खूपच पुढचे होते, असे मत अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणे आयोजित प्रबोधन महोत्सवाचे उदघाटन आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उर्मिला मातोंडकर बोलत होत्या. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रबोधन युवाशक्तीचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, किरण साळी व्यासपीठावर होते.

सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. महोत्सवाचे उदघाटन दीप प्रज्वलनाने झाले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा दृक श्राव्य माध्यमातील शुभेच्छा संदेश दाखविण्यात आला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आल

उर्मिला मांतोडकर म्हणाल्या, प्रबोधनकार कट्टर सुधारणावादी, निर्भिड वक्ते, लेखक, पत्रकार, नाटककार, अभिनेते होते. अंधश्रद्धा, अस्पृश्यतेला त्यांनी कधी थारा दिला नाही. भटभिक्षुकिला नाकारणारा हिंदुत्ववाद त्यांनी जोपासला. धर्मात सांगितलेल्या बुरसट रुढींच्या ते विरोधात होते. वैचारिक, धार्मिक गुलामगिरीत असलेल्या धर्माला बाहेर काढणारे होते. प्रबोधनकार म्हणजे कथनी आणि करणीत फरक नसावा हे मानणारे होते. समाजातील अवगुणांवर त्यांनी लेखणीने प्रहार केले. प्रबोधनाची चुकीची व्याख्या पसरत आहे. प्रबोधन म्हणजे मानसिक उद्बोधन, सामाजिक, वैचारिक उठाव. फक्त समाजाकरीता काम करणार्‍या प्रबोधनकारांचे साहित्य युवा पिढीने वाचले पाहिजे, त्याची पारायणे केली पाहिजेत, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, अशी अपेक्षा मातोंडकर यांनी व्यक्त केली.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करून, खरे प्रबोधनकार समाजापुढे आणले पाहिजेत अशी आग्रही भूमिका मांडून डॉ. आढाव म्हणाले, मी सत्यशोधक आहे, प्रबोधनकारांच्या विचारांशी माझे नाते जुळलेले आहे. इतिहास मोठा असतो पण काही कारणाने काही गोष्टींना महत्त्व मिळते तर काही गोष्टी टाळल्या जातात. प्रबोधनकारांचे कार्य राजकीय उलथापालथ असलेल्या काळातही प्रभावीपणे सुरू होते. प्रबोधनकारांनी अनेक विचारांच्या धाग्याने समाजाची बांधणी केली. आपण विचार करायचा, लोकांना विचार करायला लावायचा आणि तो मांडायचा असे प्रबोधनकारांचे सूत्र होते. जातियवादाविषयी त्यांची मते रोखठोक होती. त्यांच्यात निर्भयता होती, समाजाला पुढे नेण्याची जिद्द होती, त्यांना कर्मकांड मान्य नव्हते, प्रबोधनातूनच समाज घडत गेला आहे. शिवरायांच्या काळात त्यांनी शस्त्र हाती घेतले. सावित्रीबाई फुले यांनी पाटी-पेन्सिल हाती घेतल्याने सावित्रीच्या लेकी घडल्या तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजाला मतदानरूपी अधिकाराचे शस्त्र मिळाले. .

डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीवर सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव होता. अनेक प्रथांविषयी समाजात दुमत असते. ज्या-ज्या घटकांसाठी प्रबोधनकारांनी मते मांडली त्या विचारांना आजही धुमारे फुटत आहेत. शिवसेनेची स्थापनाच मुळी प्रबोधनकारांच्या विचारातून, त्यांनी रचलेल्या पायातून झाली आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व हा शिवसेनेचा विचार आहे. त्या पुढे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समाजातील दुर्लक्षित घटकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे अपेक्षित होते. प्रबोधनकारांचा विचार कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वत्र जावा, यासाठी प्रबोधनकारांच्या पंचनाट्यातील एखादी कलाकृती रंगमंचावर आणावी, अशी अपेक्षा त्यांनी अभिनेत्री उर्मिला मांतोंडकर यांच्याकडे व्यक्त केली.

प्रबोधनकार यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी कष्टकरी विद्यालयातील विद्यार्थांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या १०० पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. मुख्याध्यापक अनिल गिरमे आणि विद्यार्थांनी पुस्तकभेट स्वीकारली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. सरस्वती वंदना आणि पसायदान स्नेहल आपटे यांनी सादर केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading