Saturday, May 30, 2026
SportsTOP NEWS

खेलोगे कुदोगे तो होंगे लाजवाब’ : क्रीडामंत्री किरेन रिजिजू

इंडिया खेलेगा क्रीडा संस्थेच्या स्पोर्टस् इन्किलाब प्रोजेक्टच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन

पुणे : आपल्या देशात खेळाची परंपरा आहे; पण संस्कृती नाही. खेळाला, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काही तरी केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. प्रत्येक भारतीयाने आपल्या पारंपरिक खेळांवर प्रेम केले तर क्रीडा क्षेत्राला निश्चितच कलाटणी मिळेल, असा विश्वास व्यक्त करून ‘लिखोगे पढोगे तो होंगे नवाब; खेलोगे कुदोगे तो होंगे खराब’ असे न म्हणता ‘खेलोगे कुदोगे तो होंगे लाजवाब’ अशी म्हण रूढ झाली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. देशात ज्या सरकारी क्रीडा संस्था उभ्या राहतील त्यांना देशातील खेळांडूचीच नावे देणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.

क्रीडा प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पुण्यातील इंडिया खेलेगा या क्रीडा संस्थेच्या स्पोर्टस् इन्किलाब प्रोजेक्टच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन आज केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने टाकलेला चेंडू रिजिजू यांनी उपस्थितांमध्ये टोलवून दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने केले. इंडिया खेलेगा या संस्थेला गती मिळून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू या संस्थेतून निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इंडिया खेलेगा ही क्रीडा प्रशिक्षण संस्था 2017 पासून स्पोर्टस् इन्किलाब प्रोजेक्ट हा वंचित बालकांना विनामूल्य टेबल टेनिस प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवत आहे. सासवड जवळील सार्थक सेवा संघाच्या पुनर्वसन केंद्रातील मुले या उपक्रमात सहभागी झाली आहेत. या उपक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात पुण्यातील जनसेवा फाउंडेशनचे वंचित बालकांसाठीचे केंद्र, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकबिरादरी प्रकल्प, ईशान्य भारतातून महाराष्ट्रात आलेल्या मुलांसाठी काम करणार्‍या पूर्वांचल विकास आणि ईश्वरपूरम वसतीगृह व इतर संस्थांमधील मुले नुकतीच सामील झाली आहेत. क्रीडा प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण हा उपक्रमामागील उद्देश आहे.

खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, शिक्षण प्रसारक मंडळीचे पदाधिकारी अ‍ॅड. एस. के. जैन, अशोक वझे, श्रीकृष्ण चितळे, अ‍ॅड. नंदकुमार फडके तसेच साईचे राजिंदर सिंग, कोव्हिड योद्धा डॉ. धनंजय केळकर, जतिन परांजपे, उमा कुणाल गोसावी, विशाल चोरडिया, सुंदर अय्यर, अभिजित कुंटे, नंदन बाळ आदी मान्यवर उपस्थित होते. श्रुती परांजपे, सन्मय परांजपे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सैनिकांप्रमाणे खेळाडूंनाही सन्मान दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करून रिजिजू म्हणाले, क्रीडामंत्री झाल्यापासून क्रीडाविषयक सरकारी ध्येय-धोरणांमध्ये अनेक बदल केले आहेत. माजी खेळाडूंना दिनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत मदतीचा हात दिला आहे. खेळाडूंना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोच उपलब्ध करून दिले जात आहेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात आहे. भविष्यात अशी परिस्थिती यावी की, भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्यासाठी भारतीय कोचनाच प्राधान्य मिळावे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेंव्हा एखादा खेळाडू यश मिळवितो तेंव्हा संपूर्ण देश ते यश साजरे करतो. खेळाडू देशाला एका सूत्रात बांधतो, त्यामुळे खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल होणे गरजेचे आहे.

खेळाडूंच्या आहाराबाबतही पूर्वी दुजाभाव होता. त्यांना वयानुसार आहार दिला जात होता पण ही सरकारी चौकट मोडून खेळाडूच्या आहारतज्ज्ञांनी सुचविलेला परिपूर्ण आहार खेळाडूला दिला जावा, असे निर्देश आपण दिले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. भारताचा आर्थिक विकास होण्यासाठी क्रीडाक्षेत्रही एक इंडस्ट्री ठरू शकते, असे सांगून औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांशी या संदर्भात आपण चर्चा केली असून खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर मनही तंदुरुस्त राहते, असेही ते म्हणाले.

विविध खेळातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रोत्साहकांचा सत्कार रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदार परांजपे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading