fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTMAHARASHTRAPUNETOP NEWS

विजया मुळे यांचा वैयक्तिक संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सुपूर्त

पुणे, दी. १५ -भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या, लघुपट निर्मात्या, दिग्दर्शक विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील अनेक दुर्मिळ ग्रंथांचा तसेच फिल्म्सचा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त करण्यात आला. विजया मुळे यांच्या कन्या, अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी नुकताच हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे दिला आहे. विजया मुळे या त्यांच्या असंख्य लघुपटांमुळे तसेच शैक्षणिक संवादविषयक उपक्रमांमुळे अतिशय नावाजलेल्या आहेत.

विजया मुळे यांच्या वैयक्तिक संग्रहात सुमारे दोनशेहून अधिक चित्रपटविषयक ग्रंथ, अनेक व्हीएचएस टेप्स आणि १६ एम एम फिल्मचा समावेश आहे. याशिवाय चित्रपटविषयक असंख्य मासिके, जर्नल्स, चित्रपटविषयक डिक्शनरी, तसेच विविध चित्रपट महोत्सवातील माहिती पुस्तिकांचाही त्यामध्ये समावेश आहे. स्वतः विजया मुळे यांची निर्मिती असलेला ‘किशन अँड द मॅजिक चॅरियट’ ( १९८०) हा १६ एम एम शैक्षणिक चित्रपट हे या संग्रहातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. जगातील असंख्य गोष्टींबाबत मुलांना असलेले कुतुहूल कसे दूर करावे याची ‘शिकवण’ या चित्रपटात देण्यात आलेली आहे. याशिवाय इतर प्रमुख चित्रपटांमध्ये (व्हीएचएस टेप ) फ्रीझ लँग या प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्याने लिहिलेली ‘द इंडियन टॉम्ब’ ( १९२१ ), १९६९ मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेला लुईस माल्ले  यांचा ‘कलकत्ता’ ( १९६९) हा फ्रेंच लघुपट आणि कोलिन लॉ  यांचा ‘मुव्हिंग पिक्चर्स’  (२००० ) या  माहितीपटांचा समावेश आहे.  मुव्हिंग पिक्चर्स या माहितीपटात कोलिन लॉ यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील युद्धविषयक अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. 

तसेच व्हीएचएस फिल्म्समध्ये इटालियन चित्रपट निर्माते राबोर्तो रोसेलिनी यांचा समावेश असलेली   ‘हुरेयुएक्स कॉम रोसेलिनी’ नामक टीव्ही मालिकेचाही समावेश आहे. दि. ११ जानेवारी ते ६ ऑगस्ट १९५९ या काळात ‘आरटीएफ’ या फ्रेंच टीव्ही चॅनलवर प्रसारित करण्यात आलेल्या या मालिकेत स्वतः रोसेलिनी आणि फ्रेंच पत्रकार एट्टीने लालो यांचे भारताविषयक संभाषण आहे. यामध्ये रोसेलिनी यांनी भारतात  शूट केलेले फुटेज आहे.याशिवाय या फिल्म्समध्ये ( यु मॅटिक टेप )  सुहासिनी मुळे, तपन बोस आणि सलीम शेख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ भोपाळ : बियॉंड जिनोसाईड’ (१९८६) या लघुपटाचाही समावेश आहे. हा लघुपट ३ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळ येथे झालेल्या विषारी गॅस गळतीच्या भयानक दुर्घटनेवर आधारित आहे. 

            या विषयी बोलताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, हा एक प्रकारे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचाच सन्मान आहे. यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयावर अतूट विश्वास दाखविल्याबद्दल मी सुहासिनी मुळे यांचे आभार मानतो. जगातील सर्व चित्रपट संशोधकांना याचा निश्चितच उपयोग होईल. तसेच ज्यांच्याकडे असे चित्रपटविषयक दुर्मिळ साहित्य किंवा चित्रपट असतील ते त्यांनी जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading