fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

‘प्रबोधन’च्या शतकोत्सवानिमित्त संवादतर्फे व्यंगचित्र, छायाचित्र प्रदर्शन

पुणे : ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाची यंदा शताब्दी असून ‘प्रबोधन’च्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला दि. 20 जानेवारी 2021 रोजी सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे आणि व्यंगचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील कलादालनात भरविले जाणार असून कलादालनास प्रबोधन युवा कट्टा असे नाव देण्यात येणार आहे.

प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या हस्ते होणार असून प्रबोधन युवा मंचचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी निवेदनाद्वारे दिली. चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी या वेळी उपस्थित असणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 89व्या वाढदिवसानिमित्त व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख व सहकार्‍यांच्या ‘कार्टून कट्टा’ या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 89 व्यंगचित्रे प्रदर्शनात असणार आहेत.

‘शब्दांगण’ या लक्ष्मण राठीवडेकर यांच्या संस्थेच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके, प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील पुस्तके, उद्धव ठाकरे यांची पुस्तकेही पहायला मिळणार आहेत. या शिवाय प्रबोधन प्रकाशनाने प्रकाशित केलेले प्रबोधनकारांचे चार पुस्तकांचे खंड, साप्ताहिक मार्मिकचे अंक कलादालनातील ग्रंथप्रदर्शनात असणार आहेत. या शिवाय महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रबोधनकारांचा समग्र साहित्य खंड व इतर प्रकाशने उपलब्ध करून दिली आहेत.

प्रदर्शनासाठी प्रबोधनकारांचे साहित्य संकलन हरिष केंची यांनी केली असून प्रदर्शनाची मांडणी गमभन प्रकाशनचे जयदिप कडू यांनी केली आहे. हे प्रदर्शन रसिकांना पाहण्यासाठी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात खुले असणार आहे. प्रदर्शनातील साहित्य विक्रीसाठीही उपलब्ध आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading