Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

कोरोनाचे संकट दूर होऊ दे- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री सिद्धरामेश्वरांकडे साकडे

सोलापूर, दि.13 : वर्षभरापासून कोरोनाची जागतिक महामारी सुरू आहे. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा सोलापूरला गतवैभव प्राप्त होऊ दे, असे साकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री सिद्धरामेश्वरांकडे घातले.आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भरणे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार घालण्यात आलेल्या अटीनुसार पारंपरिक अक्षता सोहळा पार पडला. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य, मानकरी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी होऊ दे, असा आशीर्वाद मागितला आहे. अजून कोरोनाचे संकट संपले नाही. लसीकरण मोहीम सुरू होईल, लस दिली तरीही नागरिकांनी गाफिल न राहता सर्वांनी कुटुंबासह स्वत:ची काळजी घ्यावी. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्वांना लस दिली जाणार आहे. पुढचे दोन-तीन महिने कठीण आहेत, शासकीय नियमाचे पालन केले तर कोरोना हद्दपार होईल.

देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील

कोरोनामुळे प्रशासनाने मानकरी आणि काही भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे इतर राज्यासह, जिल्ह्यातील भक्तांना उपस्थित राहता आले नाही, दर्शन करता आले नाही. पुढच्या वर्षी नियोजनपूर्वक यात्रा साजरी करूया. सिद्धरामेश्वर मंदिर देवस्थानच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही भरणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading