fbpx
Monday, June 17, 2024
NATIONALTOP NEWS

नेपाळच्या राजाची होती भारतात समाविष्ट होण्याची इच्छा! प्रणब मुखर्जी यांच्या पुस्तकात दावा

नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ हे पुस्तक प्रकाशनाच्या आधीपासूनच फार चर्चेत होतं. या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन झाले आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरु यांनी नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह याने नेपाळला भारतात सामावून घेण्याची ऑफर फेटाळली होती, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, “नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी ही संधी अजिबात सोडली नसती, ज्याप्रमाणे त्यांनी सिक्कीमबाबत केलं होतं”

प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींबद्दल आपलं मत व्यक्त करताना म्हटलं आहे की, “प्रत्येक पंतप्रधानाची काम करण्याची एक वेगळी शैली होती. लाल बहादूर शास्त्री यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपेक्षा वेगळ्या भूमिका घेतल्या. एकाच पक्षातील असले तरी परराष्ट्र धोरण, सुरक्षा आणि अंतर्गत प्रशासन याबाबतीत पंतप्रधानांमध्ये मतभिन्नता असू शकते”.

“नेपाळमध्ये राणा राजवटीची जागा राजेशाहीने घेतल्यानंतर तिथे लोकशाही रुजावी अशी इच्छा होती. महत्वाचं म्हणजे नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह याने नेहरुंना नेपाळला भारतात समाविष्ट करुन घेण्यासंबंधी सुचवलं होतं. पण नेहरु यांनी नेपाळ एक स्वतंत्र देश असून तो तसाच राहिला पाहिजे सांगत ही ऑफर फेटाळली होती,” असा खुलासा प्रणव मुखर्जी यांनी केला आहे.

“नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी कदाचित ही संधी सोडली नसती, ज्याप्रमाणे त्यांनी सिक्कीममध्ये केलं,” असंही प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावरुन त्यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला होता. त्यांचा मुलगा आणि मुलीमध्ये यावरुन वाद निर्माण झालेला पहायला मिळाला. प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटरवरुन चिंता व्यक्त करताना पुस्तक प्रकाशित होण्याआधी आपल्याला ते पहायचं असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे प्रणव मुखर्जींची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवर उत्तर देत उगाच अडथळा निर्माण करु नये असं मत व्यक्त केलं होतं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading