बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे बनला ‘सायशा शिंदे’!
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेने सोशल मीडियाद्वारे एक मोठी बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. स्वप्निल शिंदेने नव्या वर्षात त्याचे नवे रुप आणि नवे अस्तित्त्व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आहे. स्वप्निलने आपण ‘ट्रान्सवुमन’ झाल्याचा खुलासा करत सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. स्वप्निल शिंदेने आता ‘साईशा शिंदे’ असे नामकरण केले आहे
डिझायनर स्वप्नील शिंदेनी स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नीलने त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. यासंदर्भात सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्नीलने त्याच्या नव्या रुपातले फोटो आणि एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
जे अस्तित्व माझे नाही, ते जगताना मला गुदमरल्यासारखे होत होते…
सोशल मीडियावरील या नवीन फोटोंमध्ये ‘सायशा’चा अर्थात स्वप्निल शिंदेचा नवा लूक पाहायला मिळतोय. या फोटोंसोबतच त्याने एक पोस्ट लिहीत आपण ‘ट्रान्सवुमन’ झाल्याबाबत खुलासा केला आहे. या भावूक पोस्टमध्ये तो लिहितो की, ‘शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुले मला माझ्या वागण्यावरून त्रास देत होते, तेव्हा माझ्या मनावर खूप आघात झाले. जे अस्तित्व माझे नाही ते जगताना मला गुदमरल्यासारखे होत होते. वयाच्या विसाव्या वर्षी NIFT दरम्यान, मी स्वतःचे सत्य स्वीकारण्याचे धाडस केले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मी मुक्त झाले. पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने मी समलैंगिक आहे, असे सुरुवातीला मला वाटले. पण सहा वर्षांपूर्वी मी स्वत: पूर्णपणे स्वीकारले आणि आता मी समलैंगिक नाही तर ट्रान्सवुमन आहे’, असे सायशाने लिहिले आहे.
याचबरोबर, ‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या’, या शब्दांत त्याने आपले दुःख व्यक्त केले. अखेर शस्त्रक्रियेचा आधार घेऊन स्वप्निलने ‘ट्रान्सवुमन’ होण्याचा निर्णय घेतला.
स्वप्निल शिंदेने आतापर्यंत अभिनेत्री करिना कपूर-खान, दीपिका पदुकोण, सनी लिओनी, कियारा अडवाणी, कतरिना कैफ यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. स्वप्निलच्या सोशल मीडिया पोस्टवर देखील अनेक कलाकारांनी कमेंट करत आपला पाठींबा दर्शवला आहे.
