fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त शुक्रवारपासून परिवर्तनवादी साहित्य संमेलन

पुणे- येथील जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त दिनांक ८ आणि ९ जानेवारी २०२१ रोजी परिवर्तनवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, माजी प्रशासकीय अधिकारी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, स्वामी विवेकानंद पुतळा, सातारा रस्ता, पुणे येथे होणाऱ्या या दोन दिवसीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे उदघाटन शुक्रवार दिनांक ८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० (अकरा) वाजता महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. आनंदराव पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सहकार, कृषी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्याचे सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार संजय जगताप, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आझम कँपस एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या आधी, ८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० (साडेदहा) वाजता स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून अण्णा भाऊ साठे व्यासपीठा पर्यंत परिवर्तन दिंडी काढण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर ८ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० (साडेपाच) वाजता, डॉ. मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘परिवर्तनवादी साहित्य आणि परिवर्तनाच्या चळवळी’ या विषयावरील परिसंवादात सुभाष वारे, डॉ. माधवी खरात, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विनोद शिरसाट, वि. दा. पिंगळे आणि उद्धव कानडे सहभागी होणार आहेत.

शनिवार दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ११.०० (अकरा) वाजता, डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘समाज परिवर्तन आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात सम्राट फडणीस, पराग करंदीकर, विजय बाविस्कर, मुकुंद संगोराम, अरूण निगवेकर आणि सुनील माळी हे पत्रकार सहभागी होणार आहेत.

याच दिवशी, म्हणजे ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० (साडेपाच) वाजता, होणाऱ्या ‘भारतीय संविधान आणि आजचे राजकारण’ या विषयावरील परिसंवादाला ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या परिसंवादाचे सूत्रसंचालन एबीपी माझाचे वृत्तनिवेदक प्रसन्न जोशी करणार आहेत. या परिसंवादात डॉ. विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.
या संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन साहित्य संमेलन पुरस्कार २०२१ चे वितरण सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सहकार क्षेत्रासाठी मिलिंद काळे, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, शैक्षणिक कार्यासाठी रणजित दिसले, सामाजिक कार्यासाठी सुनील चव्हाण आणि अरूण छाब्रिया यांना परिवर्तन साहित्य संमेलन पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून होणाऱ्या या संमेलनाला रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading