….आणि नवीन वर्षात आलेल्या पहिल्या तक्रारीला थेट गृहमंत्र्याचे उत्तर!
पुणे, दि. 1 – कोरोनामुळे 2020 मध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनामूळे नागरिकांना नववर्षाचे स्वागत घरातूनच बसून करावे लागले. परंतु, नागरिकांना पुढील वर्ष सुखाचे आणि समृध्दीचे तसेच गुन्हेगारी मुक्त जगण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवीन वर्षाचे स्वागत पुणे पोलीस आयुक्तालय येथे कट्रोल रूमला आलेला पहिला कॉल घेत केले.
आनंदनगर येथील शिवसागर सोसायटी येथून आलेला पहिला कॉल घेत मी अनिल देशमुख बोलतोय काय मदत हवी अशी विचारणा केली. त्यावर फोनवर समोरील व्यक्तीने आपल्या शेजारी मोठ्या आवाजात साऊंडचा आवाज येत असल्याची तक्रार केली. त्यावर लगेचच पोलिसांना आपल्या मदतीला पाठवतो असे गृहमंत्र्यांनी फोनवर बोलणाऱ्या इंद्रनील आपटेंना सांगून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी आणि त्यांच्या मार्शलने घटना स्थळी जाऊन तक्रारीचे निरसन केले. त्याबरोबरच वायरलेसच्या माध्यमातून सर्व पोलिसांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतात चिंब होत असताना पोलिस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे सहकारी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील. म्हणूनच गृहमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात कट्रोल रूमला आलेला पहिला कॉल स्विकारून समोरून आलेल्या कॉलला हॅलो मी अनिल देशमुख बोलतोय असे उत्तर देत… तुमची काय तक्रार आहे अशी विचारणाही केली. राज्यातील नागरिकांना पोलिस तुमच्या पाठीशी आहेत असा संदेश देण्यासाठी त्यांनी नव वर्षात रात्री बारानंतर आलेला तक्रारीचा फोन घेऊन त्यांनी नागरिकाच्या तक्रारीचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते केक कापून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
