Monday, June 15, 2026
NATIONALTOP NEWS

मन की बात – ‘व्होकल फॉर लोकल’ वर मोदींचा जोर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या वर्षातील अखेरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असे म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. ते म्हणाले, ‘व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचे आहे. प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्य करावा. मी आधीही बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो त्यात नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूला भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा’, असे मोदींनी सांगितले.

त्याचबरोबर ‘देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही पाहिला आहे. असंख्य आव्हाने होती, संकटे आली, कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. मात्र भारताने प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या’, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

तसेच यावेळी मोदींनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचे सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला, एकजुट दाखवली. हेसुद्धा अनेकांनी लक्षात ठेवलं’, असे मोदींनी सांगितले.

त्याचबरोबर यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह पंतप्रधानांनी नवीन वर्षात भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल, अशी कामना आपण करुयात असा संदेश दिला. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन करत त्यांचे कौतुक केले. 2020 या वर्षाने आपल्याला खूप काही दाखवले आहे आणि शिकवले आहे, असेही मोदी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading