द फुलब्राईट डायरीज् नाट्यशास्त्र अभ्यासकांनाही मार्गदर्शक; कला दिग्दर्शक चंद्रदासन
पुणे : जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी, मोजक्या अभ्यासकांना मिळणारी अमेरिकेतील फुलब्राईट फेलोशिप मिळविण्यासाठी डॉ. अजय जोशी यांनी केलेले प्रयत्न, फेलोशिप मिळाल्यानंतर अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठात शिकविताना आलेले अनुभव, अमेरिकेतील विविधांगी संस्कृतीची ओळख, भारतात परत आल्यानंतर त्यांच्या व्यक्तीमत्वात घडलेले बदल यांवर आधारित असलेले द फुलब्राईट डायरीज् हे पुस्तक ही फेलोशिप मिळवू इच्छिणार्यांनाच नव्हे तर नाट्यशास्त्र अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास केरळमधील लोकधर्मी थिएटर समूहाचे दिग्दर्शक व कला दिग्दर्शक चंद्रदासन यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी अमेरिकेतील फुलब्राईट फेलोशिप ‘कल्चर, कम्युनिटी अॅन्ड थिएटर : द इंडियन पर्सपेक्टिव्ह’ विषयी पुण्यातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. अजय जोशी यांना मिळाली आहे. ही फेलोशिप मिळवल्यानंतर अमेरिकेतील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी लिहिलेल्या ‘द फुलब्राईट डायरीज्’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यासह दिल्ली, केरळ, गुवाहटी तसेच अमेरिकेतही एकाच वेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने झाला. त्यावेळी चंद्रदासन बोलत होते.
युनायटेड स्टेटस्-इंडिया एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. आर. सुदर्शन दाश (दिल्ली), वेशभूषाकार प्रा. एलिझाबेथ क्लॅन्सी, दिग्दर्शक प्रा. केव्हिन केटल (अमेरिका), गुवाहाटी विद्यापीठाच्या बरोह महाविद्यालयातील प्रा. मानवेंद्र सरमा हे ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर पुण्यातील कार्यक्रमात फुलब्राईटचे माजी विद्यार्थी अविनाश कुंभार, डॉ. अनघा तांबे तसेच पत्रकार वृंदा जुवळे, प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी सहभागी होते.
या पुस्तकाची प्रस्तावना फुलब्राईटचे माजी विद्यार्थी कला दिग्दर्शक चंद्रदासन यांनी लिहिली आहे. ते म्हणाले, फेलोशिप मिळविण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, निवड प्रक्रिया, लेखकाला अमेरिकेत गेल्यानंतर आलेले अनुभव, अमेरिकेतील नाट्यसंस्कृती बद्दलची त्यांनी मिळविलेली सखोल माहिती तसेच तेथून परत आल्यानंतर लेखकात झालेले सकारात्म बदल आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेले लिखाण अशा चार विभागात पुस्तकाची मांडणी अत्यंत सुबक पद्धतीने करण्यात आली आहे.
डॉ. सुदर्शन दाश म्हणाले, या सांस्कृतीत देवाण-घेवाण कार्यक्रमाअंतर्गत अनेक फुलब्रायटर फेलोशिपधारक जातात-येतात परंतु डॉ. जोशी यांनी प्रत्येक क्षणाच्या अनुभवाचे कथन अतिशय समृद्धरित्या केले आहे. भारतामध्ये या उपक्रमाअंतर्गत सुरू झालेल्या सांस्कृतिक देवाण-घेवाणीला या वर्षीच 70 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने डॉ. जोशी यांचे पुस्तक नव्या पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
डॉ. जोशी यांच्या संपर्कात आल्याने मला माहित नसलेले भारतीय वेशभूषेतील, संस्कृतीतील सौंदर्य जाणून घेता आले. डॉ. जोशी यांचे अनुभवरूपी कथन सर्वांसाठीच निश्चितच स्फूर्तीदायक ठरेल, असा विश्वास प्रा. एलिझाबेथ क्लॅन्सी यांनी व्यक्त केला.
आम्ही कोण आहोत, काय करत आहोत, आम्ही काय केले आहे याचा उलगडा डॉ. जोशी यांच्या पुस्तकातून वाचकांना नक्कीच होईल, असे सांगून प्रा. केव्हिन केटल यांनी जोशी यांच्याबरोबर केलेल्या कामाविषयी अनुभव कथन केले.
प्रा. मानवेंद्र सरमा यांनी पुस्तकातील प्रत्येक प्रकरणापूर्वी काव्यात्मक पंक्ती लिहिल्या आहेत. डॉ. जोशी यांनी उद्युक्त केल्यामुळे मी कवी नसूनही या पुस्तकात कवने लिहू शकलो, असे आवर्जून नमूद केले.
डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो; पण फुलब्राईट फेलोशिप मिळविल्यानंतर त्यांच्या माहिती-अनुभवाच्या कक्षा अधिक रुंदावल्याचे दिसून आल्याचे मत फुलब्राईट फिलोशिप मिळविणारे अविनाश कुंभार यांनी व्यक्त केले.
फुलब्राईट फेलोशिपधारक डॉ. अनघा तांबे यांनी डॉ. जोशी यांच्या विविध ठिकाणच्या संस्कृतीला, तेथील लोकांना जाणून घेण्याच्या गुणवैशिष्ट्याविषयी गौरवोद्गार काढले.
डॉ. जोशी यांचे द फुलब्राईट डायरीज् हे पुस्तक म्हणजे अनुभवाने समृद्ध असलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत पत्रकार वृंदा जुवळे यांनी व्यक्त केले.
पुस्तकाचे प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना, आम्ही बहुतेकदा पडद्यामागचे कलाकार असतो असे सांगून उत्तम सर्जन असलेल्या डॉ. जोशी यांच्या आत्म्यातून आलेले हे कथन असल्याचे विषद केले.
फुलब्राईट फेलोशिपधारकाच्या भूमिकेत असताना प्रत्येकक्षणी विद्यार्थ्याच्या नजरेतून मी जे-जे काही ग्रहण केले त्याचा उपयोग पुढील पिढीला, फुलब्राईट फेलोशिप मिळवू इच्छिणार्या प्रत्येक व्यक्तीला व्हावा या आंतरिक इच्छेतून मला या पुस्तकाच्या लेखनाची स्फूर्ती मिळाली.डॉ. अजय जोशी, लेखक
