Saturday, June 13, 2026
PUNE

घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून १५ देशांतून एकत्रितपणे आॅनलाईन पद्धतीने दत्तनामाचा जयघोष


पुणे : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… आणि नर्मदे हर… अशा दत्तनामाच्या जयघोषासह घोरात्कष्टात या सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या स्तोत्राचे पठण तब्बल १५ देशांतून एकत्रितपणे करण्यात आले. आॅनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचे प्रतिनिधीत्व पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातून २१ दत्तभक्तांनी केले. 
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि प.पू. नाना महाराज तराणेकर, इंदोर प्रणीत अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरात करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर) यांनी आॅनलाईन पद्धतीने संवाद साधला. 


पद्मिनी शिवाजीराव कचरे व दिग्विजय कचरे यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, त्रिपदी परिवार पुणे शाखेचे हरि मुस्तिकर, सुभाष कुलकर्णी, गाडगीळ गुरुजी आदी उपस्थित होते. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष असून कार्यक्रमाचे पाचवे वर्ष होते. प्रातिनिधीक स्वरुपात २१ दत्तभक्त मंदिरातून तर संपूर्ण जगभरातून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम इत्यादी देशांमधून शेकडो दत्तभक्त सहभागी झाले.


प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, मनोजैविक व्याधींकरीता उपचार करणे, हे लोकमंगल स्तोत्राच्या पाठातून सहज शक्य आहे. याचा परिणाम पर्यावरण, माणूस, समाजमनावर होतो. माणसाचे भावग्रहण आणि क्लेशहरण करणारी दत्तात्रेय ही देवता आहे. भक्तांमध्ये दत्तमहाराजांबद्दल भाव असेल, तर दु:खहरण होईल. दत्तात्रय ही मुक्ती देणारी देवता आहे. अनेक भाविक मनोभावे या देवतेकडे प्रार्थना करतात. आज लोकांचे दु:ख, कष्ट, विवंचना दूर करणारे हे स्तोत्र म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने दत्तमहाराजांना नमन केले आहे. 
अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव आढळतो. कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. ट्रस्टच्या कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे – https://www.facebook.com/107521001159281 या  फेसबुक पेजवरुन भाविकांना उत्सवातील सर्व कार्यक्रम घरबसल्या पाहता येणार आहेत. तरी भाविकांनी आॅनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading