पुण्यात एक दिवस हॉर्नला द्या पूर्ण विश्रांती
लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस यांच्यावतीने नो हाँकींग डे उपक्रमाचे आयोजन
पुणे : लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस (वाहतूक विभाग) यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. पुण्यात साधारणत: दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना ब-याचश्या दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर रोजी नो हाँकीग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा.पद्माकर पुंडे उपस्थित होते.
शनिवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता प्रातिनिधीक स्वरुपात टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. तर, कोरोना साथीमुळे मुख्य कार्यक्रम यंदा आॅनलाईन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर हे असून प्रमुख पाहुणे पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, वरिष्ठ क्रीडा समालोचक सुनंदन लेले, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, डॉ.राजेश देशपांड, साई पॅकेजिंगचे शंतनु प्रभुणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.पद्माकर पुंडे करणार आहेत. दिनांक १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्ह – लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन पुणे आणि यू टयूब – मकरंद टिल्लू या पेजवरुन कार्यक्रम लाईव्ह होणार आहे.
मकरंद टिल्लू म्हणाले, शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर हा नो हाँकींग डे पाळण्याचे आवाहन संस्था करीत आहेत. दिनांक १२ डिसेंबर रोजी पुण्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचे आवाहन देखील पुणेकरांना आम्ही करत आहोत. तसेच पुण्यातल्या विविध आय टी कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी या सर्वांनाच उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्न चा आवाज प्रमुख कारण आहे. त्याच प्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
