fbpx
Sunday, May 19, 2024
PUNE

बालवयातच अंगीकारावी पर्यावरणपूरक जीवनशैली युक्ता मुखी यांचे मत

पुणे : “निसर्ग, प्रकृतीच्या नियमांसोबत राहिलो, तर निरोगी व आनंदी जीवन जगता येते. रसायनांचा, प्लास्टिकचा वापर टाळला आणि सेंद्रिय वस्तूंचा वापर वाढवला तर आपल्याला अधिक ऊर्जा मिळते. सद्यस्थितीत पर्यावरणाची होत असलेली हानी चिंताजनक आहे. त्यामुळे आपल्याला पर्यावरण संवर्धनावर लक्ष देण्याची गरज आहे. हे होण्यासाठी बालवयापासूनच आपण पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी,” असे मत मिसवर्ल्ड युक्ता मुखी यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आयोजित श्रीमती मालतीबाई सराफ स्मृती व्याख्यानमालेत युक्ता मुखी ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर बोलत होत्या. श्रीमती सरोजनी कावळे यांनी श्रीमती मालती सराफ यांच्या आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होता, हे सांगितले. डॉ. नीलिमा राजूरकर यांनी प्रास्ताविक व नीता शहा यांनी परिचय करुन दिला. विविध सामाजिक आणि धर्मदाय कार्यात सहभाग घेणाऱ्या युक्ता मुखी यांना प्रा. सराफ यांनी बोलते केले. प्रा. विनय र. र. यांनी आभार मानले. 
युक्ता मुखी म्हणाल्या, “मिसवर्ल्ड किताब जिंकल्यानंतर एचआयव्ही, स्तनाचा कर्करोग आणि थॅलेसीमियामुळे पीडित लोकांसाठी काम केले. तसेच सामाजिक वनीकरण, स्वच्छ व सुंदर परिसर आदी सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला. कल्याणीनगरमध्ये सलीम अली पक्षी अभयारण्य बचाव मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. कमीतकमी संसाधनांचा व रसायनमुक्त वस्तूचाय वापर, शून्य कचरा निर्मिती, पुनर्वापर आदी संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करत आहे.”

“ऋतुचक्रानुसार आपण नियोजन केले पाहिजे. पाण्याचा जपून वापर आणि पुनर्वापर करायला हवा. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे त्यांच्यात पर्यावरण संवर्धनाची बीजे रुजण्यासाठी मोठ्यांनी पर्यावरणपूरक जीवन जगण्याला प्राधान्य दिले पाहिजे. प्लास्टिकचा कमीतकमी वापर केला पाहिजे. कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासह स्वच्छतेवर बहर द्यावा,” असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, “पर्यावरणाला हानिकारक असलेल्या गोष्टींचा वापर टाळण्याचा वापर आपण करू. प्रदूषण होणार नाही, यासाठी काळजी घेऊ. पर्यावरणाशी एकरूप होऊन जगण्याचा आनंद घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्या मातोश्री मालती सराफ यांनीही आयुष्यभर पर्यावरणपूरक जीवन जगण्याला प्राधान्य दिले होते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading