Thursday, June 18, 2026
MAHARASHTRATOP NEWS

ऐन दिवाळीत पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा जवान शहीद

कोल्हापूर – पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी (ता. आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे भारतीय सैन्यातील जवान शहीद झाले आहेत. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे 2018 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ऋषीकेश यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. ते 6 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. लॉकडाऊन काळात 120 दिवस गावी राहिल्यानंतर ऋषीकेश जोंधळे हे 11 जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाले.

सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झालेले जवान ऋषीकेश जोंधळे हे अविवाहित होते. राष्ट्रीय खेळाडू असल्याने ते इंडियन आर्मीमध्ये भरती झाले. लहानपणापासून उराशी बाळगलेलं देश सेवेचं स्वप्न पूर्ण झालेलं असतानाच ऋषीकेश यांना वीरमरण आलं. ऐन दिवाळीत आपल्या सुपुत्राला गमावल्याने कोल्हापूरसह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद ऋषीकेश जोंधळे यांचे पार्थिव उद्या रात्री त्यांच्या मूळ गावी आणलं जाईल, अशी माहिती आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading