जवानांच्या नावे दिवा लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
नवी दिल्ली – देशात गुरुवारपासून दिवाळीच्या शुभपर्वाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोना रोगाच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र साधेपणाने दिवाळी साजरी केली जात आहे. अशावेळी सीमेवर राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे. दरम्यान पंतप्रधानांनी ट्विट करुन देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त सीमेवरील जवानांच्या नावाने एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे की, “या दिवाळीत आपण सीमेवरील जवानांना सलामी देण्यासाठी एक दिवा लावायला हवा. आपल्या सैनिकांच्या महान पराक्रमासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आम्ही सीमेवरील सैनिकांच्या कुटुंबियांचे खूप आभारी आहोत”.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. गेल्या वर्षी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील एलओसीजवळच्या राजौरी जिल्ह्यात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्याअगोदर त्यांनी उत्तराखंड आणि इतर ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी केली होती. यंदा मोदी जैसलमेरमध्ये जाऊन ते दिवाळी साजरी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
