महाराष्ट्रातील ५ हजार कुटुंबांना ‘आत्मनिर्भर किट’ मधून दिवाळीचा गोडवा

पुणे : ज्या महिलांना रोजगार नाही, त्यांच्याकडून फराळाचे पदार्थ तयार करुन घेणे आणि ज्या गरजू कुटुंबांना दिवाळी साजरी करणे शक्य नाही, त्या महाराष्ट्रातील ५ हजार कुटुंबांना आत्मनिर्भर दिवाळी किट देण्याचा उपक्रम महा एनजीओ फेडरेशनने हाती घेतला आहे. याकरीता राज्यातील १०० हून अधिक सामाजिक संस्था उपक्रमात सहभागी झाल्या असून बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबत गरजूंची दिवाळी गोड करणारा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संयोजन पुण्यातून होत आहे.
महर्षिनगर येथील एमव्हीपीएम चे लक्ष्मी हॉस्टेल येथे फराळाचे पदार्थ बनविण्यासह इतरही काम प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ५०० महिला करीत आहेत. या उपक्रमाची संकल्पना फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांची असून उपक्रम प्रमुख गणेश बाकले यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. उपक्रमाला माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, चंद्रकांत राठी यांसह अनेकांचे सहकार्य मिळाले आहे. 
शेखर मुंदडा म्हणाले, महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सेवाकार्य सुरु आहे. कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्रातील ३ लाख गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात देखील बेरोजगार महिला आणि गरजू कुटुंबांमध्ये आत्मनिर्भर दिवाळी साजरी करावी, ही संकल्पना सुचली. त्यामुळे राज्यातील पुणे, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी भागांत ५ हजार किट देण्यात येत आहेत. ज्यामध्ये अर्धा किलो चिवडा, पाव किलो चकली, पाव किलो लाडू, दोन दिवे, उटणे यांसह आरोग्याच्या दृष्टीने दोन मास्क यांचा समावेश आहे.  
गणेश बाकले म्हणाले, पुण्यामध्ये फराळाचे पदार्थ बनविण्याचे काम गेल्या १० दिवसांपासून सुरु आहे. यंदाच्या दिवाळीत लावूया मदतीचा दिवा गरजूंच्या दारी, या भेटवस्तूने खुलूदे हसू सर्वांच्या ओठी, न राहो कोणी उदास आणि मिळो आनंद प्रत्येक घरी, याच ध्येयाने साजरी करुया ही आत्मनिर्भर दिवाळी असा संदेश देखील यामाध्यमातून आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील सुमारे १०० सामाजिक संस्थांनी या उपक्रमाला साथ देत असल्याने तळागाळातील कुटुंबांपर्यंत प्रत्यक्षपणे किट पोहोचविणे शक्य होत आहे. सुमारे अडीच हजार किलो चिवडा, १० हजार लाडू, १२५० किलो चकली, १० हजार पणत्या, ५ हजार उटणे पाकिटे, १० हजार मास्क या महिलांनी साकारले असून ते गरजू कुटुंबांना विनामूल्य देण्यात येणार आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: