इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. ६ – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेज बंद आहेत. आता राज्यात अनलॉक प्रक्रियेअंतर्गत वेगवेगळ्या सुविधांना शिथिलता देण्यात आली आहे. दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यास मे महिन्या पूर्वी १० वी आणि १२वीच्या परीक्षा घेण शक्य आहे. परंतु दिवाळी नंतर शाळा सुरु झाल्या नाहीतर या परीक्षा मे पूर्वी होणं शक्य नाही. म्हणूनच ९वी ते १२वीच्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर होण्यासाठी दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दिवाळी नंतर शाळा-कॉलेज सुरु झाल्यास विद्यार्थ्यांना वर्गात सोशल डिस्टेंन्सिंगचे पालन करुन बसवण्यात येईल, तसेच योग्य काळजी आणि नियमांच्या चौकटीत राहून शाळा सुरु करण्याची तयारी शिक्षण विभागाने दर्शविली आहे. त्यामुळे जर शाळा-कॉलेज दिवाळी नंतर सुरु केल्या तर मे महिन्यात १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येऊ शकते असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मे पूर्वी झाली नाहीतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. मे नंतर जून, जुलै, आणि ऑगस्ट महिन्यात पावसाळा सुरु होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जात परीक्षा द्याव्या लागतील. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. त्यानंतर निकाल या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शाळा सुरु होणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

दिवाळीनंतर ९वी ते १२वी शाळा-कॉलेज सुरु केल्या जातील. त्यामुळे १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्याची कोणतीही घाई नाही. त्यांचे ऑनलाईन वर्ग सुरुच राहतील. शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. शाळा सुरु झाल्यावर त्या बंद होऊ नयेत यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. इतर राज्यात शाळा सुरु केल्यावर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडत आहेत. तशी स्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये या दृष्टीने पाऊलं उचलली जात असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: