विज्ञानाचे नाव घेऊन चाललेल्या दिशाभूली पासून सावध रहा! – विज्ञान संशोधकांचे आवाहन

“फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी” या प्रा. प.रा.आर्डे लिखित पुस्तकाचे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७५ व्या जन्मदिवसानिमित्त १ नोव्हेंबर रोजी आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र तर्फे प्रा. प. रा. आर्डे लिखित ‘फसवे विज्ञान : नवी बुवाबाजी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ वैज्ञानिक व लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले. विज्ञानलेखक व माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, अंनिस महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे यावेळी उपस्थित होते. अंनिसच्या २०० कार्यकर्त्यांनी व वाचकांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावून विज्ञानाचे नाव घेऊन सुरू असलेली फसवणूक समजून घेतली

सांगली येथील प्रा.आर्डे हे भौतिकशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ते सल्लागार संपादक आहेत. १९८९ साली प्रसिद्ध झालेल्या “अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम” या पुस्तकाचे डॉ नरेंद्र दाभोलकरांबरोबर ते सहलेखक आहेत.

सुरुवातीला प्रा. आर्डे यांनी पुस्तकाच्या निर्मितीविषयी प्रास्ताविक केले. अध्यात्माच्या आणि छदमविज्ञान क्षेत्रातील दांभिक लोकांचा पर्दाफाश करणाऱ्या जेम्स रँडी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनी आदरांजली वाहिली. डॉ. आर्डे यांनी हे पुस्तक चमत्कार भंजक जेम्स रँडी, द गॉड डिल्युजन या पुस्तकाचे लेखक रिचर्ड डॉकिन्स आणि महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना अर्पण केले आहे. प्रा. आर्डे यांनी स्टीव्ह जॉब्स त्याच्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी छदमविज्ञानाच्या नादाला लागल्याने त्याचे कसे नुकसान झाले यावर प्रकाश टाकला. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सोशल डार्विनिझम (जो बलवान, तोच टिकेल) आणि युजेनिक्स (वंशशुद्धता व वंशश्रेष्ठत्त्व) सुप्रजनन शास्त्र या संकल्पनांमुळे हिटलरच्या नाझी राजवटीत ज्यूंचा नरसंहार झाला यामागे सुद्धा छदमविज्ञान किंवा भ्रामक विज्ञान होते असे आर्डे यांनी सांगितले. पुस्तकाची ओळख करून देताना यासारखी अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत असं त्यांनी सांगितले. फसवे विज्ञान या विषयावर मराठी तील हा पहिलाच ग्रंथ असलेने वाचक याचे जोरदार स्वागत करतील.

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी या पुस्तकाचे महत्त्व सांगताना भ्रामक सत्य किंवा भ्रामक इतिहास कसा पसरवला जातो हे स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राची हिंदुत्त्वाच्या अंगाने कशी मांडणी होते याचे विश्लेषण करत तपशिलात सांगितले. प्रा. आर्डे यांच्या या पुस्तकाच्या हिंदी अनुवादासाठी रू ३४०००ची देणगी देत असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले की, “१९९५ च्या सुमारास भारतीय ज्ञानपीठने जेव्हा विज्ञानेश्वरी या माझ्या पुस्तकाचा गौरव केला तेव्हा नवी दिल्लीतील विज्ञान भवन मधील कार्यक्रमात अनेक विज्ञान लेखक, वैज्ञानिक उपस्थित होते. प्रा. यशपाल यांनी त्यावेळी छदमविज्ञान विषयावर पुस्तक लिहिण्याची गरज बोलवून दाखवली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर हे सुद्धा त्यावेळी उपस्थित होते.” या विषयावरील पुस्तकाची गरज प्रा. आर्डे यांनी पूर्ण केली त्याबद्दल दाभोलकरांनी त्यांचे अभिनंदन केले.

माजी कुलगुरू प्रा. पंडित विद्यासागर म्हणाले, “भ्रामक असेल तर ते विज्ञान नाही आणि विज्ञान असेल तर ते भ्रामक कसे आणि कदाचित भ्रम जाणूनबुजून पसरवण्यासाठी वापरले जाणारे विज्ञान या अर्थाने हा विषय समजून घेतला पाहिजे.” आजपर्यंतच्या आपल्या शिक्षण व संशोधन क्षेत्रातील विविध अनुभवांच्या आधारे त्यांनी सांगितले की, “भ्रामक माहितीचे जागतिकीकरण झाले आहे. ज्याप्रमाणे उत्क्रांतीविषयक गैरसमज जगातील सर्व देशांतील उच्चपातळीवरील नेत्तृत्त्व करणार्या लोकांमध्ये आहेत, त्याच प्रमाणे भ्रामक माहितीला बळी पडण्याचे प्रमाण सुद्धा उच्चशिक्षित लोकांमध्ये असते. बऱ्याच वेळा या भ्रामक माहितीमागे काहीतरी आर्थिक किंवा इतर अतिरंजित लाभाचे दावे केले जातात, त्यातून शोषण सुद्धा होते. आपल्या मेंदूला सातत्याने सुखकारक अनुभव देण्याचा दावा करणाऱ्या आश्वासनांना किंवा घोषणांना आपण बळी पडतो.” डॉ. विद्यासागर यांनी भ्रामक विज्ञान पसरवण्यासाठी उपलब्ध वैज्ञानिक संशोधन प्रक्रिया, त्याच्याशी निगडीत नियतकालिके आणि संशोधन संस्था यांच्या नावाचा, कामाचा सुद्धा कसा गैरवापर होतो यावर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. विद्यासागर यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये भ्रामक किंवा फसव्या वैज्ञानिक माहितीच्या आधारे उघडकीस आणलेल्या तसेच यासाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. यामध्ये फलज्योतिष विषयांवर त्यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या बरोबर आयोजित एका विशेष वाद-विवाद सभेचा विशेष उल्लेख केला.

अंनिस महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, “समाजाच्या भल्यासाठी घेतलेला वसा शेवटपर्यंत पाळणारे एक म्हणजे प्रा. आर्डे ! या पुस्तकातील प्रत्येक संदर्भ म्हणजे हजारो लोकांना या विषयावर पडू शकणाऱ्या प्रश्नांची मेहनतीने तयार केलेली उत्तरे होय. हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र अंनिस ट्रस्टने या प्रकारच्या सामाजिक प्रबोधनासाठी आवश्यक पुस्तकांना मदत करण्याचे ठरवले आहे.”

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अभिवादन गीताने झाली. महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: