IPL 2020 – कोलकाताने केले राजस्थानचे पॅकअप

दुबई, दि. 1 – रविवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा 60 धावांनी पराभव केला. या विजयामुळे केकेआरचे 14 लढतीत 14 गुण झाले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे राजस्थानने आयपीएलमधील गाशा गुंडाळला आहे.

केकेआरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 191 धावा चोपल्या. केकेेआरचा कर्णधार इयान मॉर्गन याने 35 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 68 धावा चोपल्या. मॉर्गन व्यतिरिक्त गिलने 37, त्रिपाठीने 39 आणि रसेलने 25 धावांचे योगदान दिले. राजस्थानच्या राहुल तेवतीया याने सर्वाधिक 3 बळी घेतले. यासह त्यागीने 2 आणि आर्चर व गोपाळने प्रत्येकी 1 बळी घेतला.

सुरुवातीच्या लढतीत फ्लॉप गेलेला पॅट कमिन्स याने आज बळींचा चौकार लगावला. त्याने 4 षटकात 34 धावा देत 4 बळी घेतले. मावी आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2, तर नांगरकोटी याच्या खात्यात 1 बळी आला. 192 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाला सुरुवातीपासून गळती लागली. 7 फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. राजस्थानच्या जोस बटलर याने सर्वाधिक 35 आणि तेवतीया याने 31 धावांची खेळी केली.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये चेन्नई, राजस्थान आणि पंजाब हवं संघ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. एकट्या मुंबई इंडियन्स प्ले ऑफ गाठली असून बंगळुरू, हैद्राबाद, कोलकाता आणि दिल्ली या संघात प्ले ऑफच्या अन्य 3 जागांसाठी चुरस कायम आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: