fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू – खासदार संजय राऊत

पुणे, दि. 31 – जोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते, तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबई होते, आता तो पुणे झाला आहे. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात अहेत, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे लोकनेते आहेत. मागील कित्येक वर्षात लोकांमध्ये जाणारा असा नेता मी पाहिला नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पवार यांचं कौतुक केले. शरद पवार राज्यातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा सल्ला घेतला म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याच कारण नाही. देशातील अनेक नेते शरद पवार यांचा सल्ला घेतात. आपण त्यांचा सल्ला घेतला नाही, तर आपल्यासारखे आपणच करंटे असू, असा टोलाही राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

बिहार विधानसभा निवडणुकीत गडबड न झाल्यास तेजस्वी यादव पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही. शेवटी लोकभावना दडपता येणार नाही, असे सूतोवाचही संजय राऊत यांनी केले. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी राजकारण केलं पाहिजे, असा खोचक सल्लाही राऊत यांनी दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. राजभवन काही राजकारण करण्याची जागा नाही. त्यांनी बाहेर राजकारण करावे, असे आव्हानच खा. राऊत यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत. आम्ही कायम त्यांचा सन्मान केला आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ध्यानीमनी नसताना ते मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे, असा चिमटा राऊत यांनी काढला.

आव्हान निर्माण करणं विरोधकांचा अजेंडा आहे. मात्र ती आव्हानं आपण राज्यासमोर निर्माण करत आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं, या मताचा मी आहे. विरोधी पक्ष राहूच नये, असं केंद्रातील सरकारला वाटतं. केंद्र सरकारचा राजकीय दहशतवाद घातक आहे. लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष असायला हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. परंतु सध्या दुर्दैवाने आपल्या विचाराचे नाहीत, त्यांना राजकारण, समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका तयार होताना दिसत आहे, असा हल्ला खा. राऊत यांनी नाव न घेता भाजपवर चढविला. अख्या जगाचं लक्ष बिहारकडे लागलं आहे. निवडणुकीत गडबड न झाल्यास तेजस्वी यादव बहुमताने मुख्यमंत्री होतील. शेवटी लोकभावना दडपता येणार नाही, असे मत खा. राऊत यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य करताना खा. राऊत म्हणाले, हे सरकार होणार नाही, असं काही लोकांना वाटत होतं, पण माझ्यासारख्या काही लोकांना सरकार अशा प्रकारे घडेल, असं अाधीपासून वाटत होतं. हे सरकार १५ दिवसांत कोसळेल, अशाही काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. परंतु सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने पाच वर्ष टिकेल, असा विश्वास खा. राऊत यांनी व्यक्त केला.

आमचे हिंदुत्व राजकीय नाही. आम्ही राजकारणासाठी हिंदुत्वाचा कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपण हिंदुत्त्वाची भूमिका मांडत आहे. घंटा बडवल्या, शेंडी-जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्व नाही, असा टोला खा. राऊत यांनी लगावला. कंगनाला जास्त महत्व देऊ नये, ती एक संशयित आरोपी आहे. ती पोलिसांसमोर हजर राहणे गरजेचे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा उल्लेख अशा प्रकारे करणे कितपत योग्य आहे. त्यांची लायकी नाही, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगला संवाद आहे, असं मला वाटतं, असे सांगून खा. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये चांगला संवाद असायला हवा. परंतु अनेकदा ही श्रृंखला तुटताना दिसत आहे. विरोधी पक्षाने आपलं महत्व ओळखायला हवं. आम्ही १०५ असून समांतर सरकार चालवत आहोत, असा विचार त्यांनी केला पाहिजे. सत्ता गेली म्हणून राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही, अशा शब्दात खा. राऊत यांनी भाजपला फटकारले.

राऊत म्हणाले, राज्यातील सरकारसाठी मधला काही काळ संकटाचा होता. उद्धव ठाकरे यांच्या जागी दुसरी कोणती व्यवस्था असती तरी वेगळं काही घडलं नसतं. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण लढाई चांगल्या प्रकारे मॅनेज करण्यात आली. इतर राज्यांत आपण करत आहोत, त्यातील कोणत्याही सुविधा नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आरोग्यविषयक संकटाचा हिमतीने सामना केला. अन्यथा अराजक झालं असतं, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading