fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRA

नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल – सरन्यायाधीश शरद बोबडे

नागपूर, दि. 31: सामान्य नागरिकाला जलद न्यायासाठी न्यायकौशलची (ई-रिसोर्स सेन्टर) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल. यासाठी न्यायप्रक्रियेत ई-फायलिंग सारख्या प्रक्रियेला गती देऊन कायद्याचे राज्य अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश  शरद बोबडे यांनी आज उच्च न्यायालयात केले.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत न्याय कौशल केंद्राचे (ई-रिसोर्स सेन्टर) उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भू्‌षण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, न्यायमूर्ती ए.ए.सयद, न्यायमूर्ती नितीन जामदार उपस्थित  होते.

कोरोना संसर्ग काळात सर्वोच्च न्यायालयाचे काम हे  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले. काही राज्यात तर मोबाईल व्हॅनद्वारेही काम करण्यात आले. तंत्रज्ञानावर आधारित ई-कोर्ट प्रणालीव्दारे वेळ, श्रम, पैसे यांची बचत होईल, मात्र यासाठी तंत्रज्ञानाची सहज व समानतेने उपलब्धता असावी अशी अपेक्षाही सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.

नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी असून  येथून सुरू झालेली न्यायकौशल सारखी केंद्र देशभरात कार्यरत व्हावी. न्याय व्यवस्थेवरील कामाचा ताण ई-रिसोर्स सेन्टरच्या माध्यमातून कमी  होण्यास मदत होईल. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या न्यायदानातील वापराने न्यायप्रणाली अधिक वेगवान व सुलभ होईल असेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. ते म्हणाले, मोटार व्हेईकल ॲक्ट, समन्स बजावणे ही कमी प्राथमिकतेची कामे देखील  एका क्लिकवर मोबाईलद्वारे तात्काळ होऊ शकतात. त्यामुळे प्राथमिकतेच्या नावाखाली न्यायदानाला विलंब लागणे बंद होईल. 20 हजार पानांच्या एखाद्या खटल्यातील पूरक माहिती शोधण्याचे कार्य ई-फायलींगमुळे काही सेंकदात शक्य होईल. न्याय कौशल हे केवळ वकील, तक्रारकर्ते यांच्यासाठीही वरदान नसून मध्यस्थीसाठी देखील या व्यासपीठाची उपयुक्तता  असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे समतोल व सुलभ न्यायदान वाढेल याचा सर्वाधिक फायदा शेतकरी, कष्टकरी, महिला व तळागाळातील घटकांना होईल. यावेळी 54 केसेस न्यायकौशलच्या माध्यमातून दाखल झाल्याची माहिती सरन्यायाधीशांनी दिली. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना  मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी न्यायकौशल केंद्र सुरू करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी राज्यात ई-प्रणालीच्या वापराचे जाळे बळकट होत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी  ई-न्यायदान  येणाऱ्या काळामध्ये दीर्घकालीन व्यवस्था ठरणार आहे. यामुळे काटोलसारख्या तालुकास्तरावरूनही देशातील कोणत्याही न्यायालयाशी संपर्क साधणे शक्य झाले.  ही आनंदाची बाब असल्याचे म्हटले.

ई-न्यायप्रणालीचे प्रमुख न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी संपूर्ण भारतात न्यायव्यवस्थेमध्ये वापरण्यात येत असलेल्या ई-प्रणालीची सद्यस्थिती सादरीकरणातून मांडली. ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

कोविड  सुरक्षासंकेतानुसार मोजक्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे  माजी मुख्य  न्यायमूर्ती  भूषण धर्माधिकारी यासह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभिंयता जर्नादन भानुसे,  अभियंता राजेंद्र बारई,  अंभीयता चंद्रशेखर गिरी, दिनेश माने, राजेंद्र बर्वे व  विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता मनिष पाटील यासह मीडिया वेव्हजचे अजय राजकारणे यांचा  यावेळी डिजिटल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचलन ॲड. राधिका बजाज, न्यायाधीश शर्वरी जोशी तर आभार न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading