कोरोना – एसटीचं उत्पन्न घटलं, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी डेपो, स्थानक गहाण ठेवणार – अनिल परब
मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसह प्रवासी सेवेचे काम बजावणाऱ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत. दिवाळी तोंडावर आल्याने कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देणं गरजेचं आहे.तसेच, इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठीही पैसे लागणार असून त्याकरता एसटी महामंडळ २ हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलीय. तसेच एसटीकडून राज्यसरकारकडे 3600 कोटींचा प्रस्ताव देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
कामगारांचे तीन महिन्यांचे पगार थकले असून पगार देण्यासाठी 900 कोटी रुपये हवे आहेेत. तर, एसटीला साडेपाच हजार कोटींचा तोटा
शासनाकडे 3600 कोटी मागितले. मालवाहतुकीसाठी गाड्या वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही परब यांनी सांगितले.
कोरोनाकाळात एसटी महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही त्यामुळे एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा तोटा साडे पाच हजार कोटींचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजे. नाही तर तोटा वाढतो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधनं वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झालं. त्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत. त्यातच दिवाळीसारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे 3600 कोटींचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याला मोठा तोटा सहन करावा लागल्याने एसटीला मदत करावी अशी शासनाचीही परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचं कर्ज काढण्यात येईल, असं परब म्हणाले.
बँकांकडे एसटीची चांगली पत आहे. त्यामुळे कर्जासाठी बँकांकडे एसटी डेपो आणि स्टँड गहाण ठेवण्याचा एसटीचा विचार आहे. त्याला परब यांनी दुजोरा दिला. एसटीची मालमत्ता तारण ठेवणं म्हणजे सर्व काही बँकांना हँडओव्हर करणं असं होत नाही. ही मालमत्ता केवळ विशिष्ट काळासाठी त्यांच्या ताब्यात राहील. नंतर पैसे दिल्यावर आपली मालमत्ता सोडवण्यात येईल, असंही ते म्हणाले.