Tuesday, June 16, 2026
PUNE

सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं, जगभर पुण्याची परंपरा जावी : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे: पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली कट्ट्यावर उत्साहात पार पडले .पुणेकरांचे लाडके हॉटेल असलेल्या हॉटेल वैशाली चे मालक जगन्नाथ शेट्टी आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान पान सेवा करणाऱ्या या हॉटेल च्या कामगारांना प्रकाशनाचा मान देण्यात आला.या सर्वांच्या हस्ते प्रकाशन झाले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती या प्रकाशन समारंभाला होती.

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पुण्यातील यशस्वी साहित्य संमेलनानंतर पुणे शहरावर दरवर्षी दिवाळी अंक ‘पुण्यभूषण ‘ या नावाने काढण्याची अभिनव प्रथा डॉ सतीश देसाई यांनी साहित्य संस्कृती विश्वात सुरु केली.एका शहराला समर्पित असलेला हा एकमेव दिवाळी अंक मानला जातो.या परंपरेतील हा दहावा दिवाळी अंक आहे .

पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई म्हणाले,’’दरवर्षी आम्ही पुण्याला साजेशी संकल्पना घेवून प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो.यावर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या ‘वैशाली हॉटेल ‘ या कट्ट्यावर प्रकाशन समारंभ करीत आहोत .यापूर्वी पोस्टमन,सांस्कृतिक विश्व ची बातमीदारी हाताळणारे पत्रकार ,दगडूशेठ गणेश मंदिर ,बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे विविध मान्यवर पुणेकरांना आणि ठिकाणांना प्रकाशन समारंभाचा मान दिला गेलेला आहे.

यावर्षीच्या अंकातील पहिले मानाचे पान जगन्नाथ शेट्टी यांना समर्पित करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे ,पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख ,आठवणी हे यावर्षीच्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे .

प्रकाशन समारंभात शेखर केंदळे यांनी राग भटियार गाऊन प्रारंभ केला. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. सुरेश ( काका ) धर्मावत यांनी आभार मानले.

यावेळी विश्वजीत जाधव, दयानंद शेट्टी, सुरेश धर्मावत, नंदकुमार काकिर्डे, रवी चौधरी,दीपक दाते, गौतम गेलडा , अॅड.मंदार जोशी, दिलीप कुंभोजकर आदी उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यभूषण अंकामुळे पुण्याची विशेष ओळख तयार झाली आहे. या दशकपूर्तिच्या निमित्ताने पुढील वर्षी तयार होणाऱ्या संग्राह्य खंडाच्या निर्मितीसाठी पालिका सहकार्य करेल.पुण्यभूषण दिवाळी अंकाला, परंपरेला पालिका भक्कम सहकार्य करेल. पुण्यातील जनजीवन, सण, परंपरा, सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं, हीच इच्छा आहे. तसे प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी या शहराची कोविड काळात काळजी घेतली. हे संकट लवकरच जाईल. पुण्याची सांस्कृतिक ओळख जगात पोहोचवू. पुण्यभूषण ची सांस्कृतिक चळवळ त्यात उपयोगी ठरत आली आहे.

जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading