कायनेटिक ग्रीनने बाजारात आणली, देशातील पहिली वन-टन इलेक्ट्रिक तीनचाकी सफर जम्बो

पुणे, दि. 27 –  कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि. या भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने आज आपले पहिले उच्च कामगिरीने परिपूर्ण असे इलेक्ट्रिक मालवाहतुकीचे तीनचाकी वाहन कायनेटिक सफर जम्बो बाजारात आणले. सफर जम्बो हे इलेक्ट्रिक वाहनांची चाकोरी मोडणारे उत्पादन आहे. कायनेटिकच्या डीएसआयआर मान्यताप्राप्त ईव्ही आरअँडडी लॅबने या वाहनाचे डिझाइन केले आहे. या तीनचाकी वाहनात प्रगत तंत्रज्ञानाने युक्त अशा सुविधा दिलेल्या असून, याचे भाग १०० टक्के भारतात तयार झालेले आहेत. 

शहरी भारतातील अगदी दुर्गम भागातील डिलिव्हरीच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने खास डिझाइन करण्यात आलेले हे सर्वाधिक किफायतशीर व सोयीस्कर उत्पादन आहे. नवीन कायनेटिक सफर जम्बो हे वाहन एल5 विभागात मोडते. याचे जीव्हीडब्ल्यू १ टनाहून अधिक आहे. यात खास विकसित केलेला कार्गो बॉक्स बसवण्यात आलेला आहे. या वाहनाची १५० चौरसफूट क्युबिटची क्षमता आणि पेलोड ५०० किलोग्रॅम्सच्या जवळपास आहे. यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण झालेल्या होम डिलिव्हरीविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी हे वाहन अनुकूल आहे. किराणा सामानापासून विविध वस्तू घरपोच देण्यासाठी हे वाहन उपयुक्त आहे. गॅस सिलिंडर आणि पाण्याच्या वितरणासाठी हे वाहन उपयुक्त आहे, कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे, एफएमसीजी माल घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच व्हाइट गुड्सच्या होम डिलिव्हरीसाठी हे वाहन उत्तम आहे. त्याचबरोबर “सब्जी किंवा मील ऑन व्हील्स”सारख्या विशेष उपयोजनांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

हे वाहन १०० टक्के इलेक्ट्रिक असल्याने, कार्बन उत्सर्जन व ध्वनीची निर्मिती याद्वारे अजिबात होत नाही आणि म्हणून डिलिव्हरीची कामे शांततेने व पर्यावरणपूरक पद्धतीने होऊ शकतात. शिवाय या वाहनाला इंधन लागत नसल्याने ते चालवण्याचा खर्च प्रति किलोमीटर ५० पैसे एवढा कमी आहे. डिझेल इंजिनवर चालणा-या तीनचाकी मालवाहू वाहनांचा खर्च प्रति किलोमीटर ३ रुपये एवढा आहे.

या वाहनाचा सर्वोच्च वेग ५५ किलोमीटर प्रतितास एवढा आहे, तर ग्रेडिएबिलिटी (चढण चढण्याची क्षमता) १० अंशांपर्यंत आहे. त्यामुळे हे वाहन भारतातील, लहान किंवा मोठ्या, सर्व शहरांसाठी अनुकूल आहे. भारतातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन या वाहनाचे डिझाइन करण्यात आले आहे. एतद्देशीय पद्धतीने डिझाइन करण्यात आलेले हे वाहन आधुनिक तंत्रज्ञानाने व हाय-टेक फीचर्सने युक्त आहे. यामध्ये टिकाऊपणा व सुरक्षिततेसाठी पूर्णपणे स्टीलची बॉडी, दणकट सीईडी कोटेड स्टील चॅसिस, डिजिटल क्लस्टर, गतीशील एसओसी, संवादात्मक कायनेटिक कोनेक्ट एपीपी व जीपीएसने युक्त कॅन आधारित नियंत्रक, स्वतंत्र रीअर सस्पेन्शनच्या माध्यमातून अधिक चांगले स्थैर्य, हायड्रोलिक ब्रेक्स आणि कायनेटिस इंजिनीअरिंग या प्रेषण प्रणालींमध्ये तज्ज्ञ असलेल्या समूहातील कंपनीने डिझाइन केलेला अनोखा गीअर बॉक्स यांचा समावेश आहे.

सफर जम्बो प्रगत लिथिअम इऑन बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर हे वाहन १२० किमी अंतर कापू शकते. हे वाहन स्वॅपेबल बॅटरी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक लोडर या भक्कम स्थानिक पुरवठा साखळीचे पाठबळ असलेल्या तसेच भारतात विकसित झालेल्या नवोन्मेषकारी तंत्रज्ञानामुळे भारत सरकारद्वारे ग्राहकांना दिल्या जाणा-या फेम टू सबसिडीसाठी हे वाहन पात्र ठरले आहे. याशिवाय या क्षेत्रातील सर्वाधिक ३ वर्षांची वॉरंटी या उत्पादनासह दिली जाणार आहे. 

कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्स लि. च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी  म्हणाल्या, “भारतीय बाजारपेठेत हे चाकोरीबाह्य ई3डब्ल्यू आणताना आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे. या वाहनाची उच्च कामगिरी व मोठा भार वाहण्याची क्षमता यांमुळे भारतातील होम डिलिव्हरी क्रांतीचे नेतृत्व करण्याची क्षमता यामध्ये आहे! गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: कोविडउत्तर “न्यू नॉर्मल”मध्ये, भारतात ई-कॉमर्स क्षेत्राची प्रचंड वाढ होताना आपण बघत आहोत. सर्व प्रकारच्या उत्पादने व किराणा माल घरपोच मागवला जात आहे. आमची सफर जम्बो ही खास अशा प्रकारच्या ई-कॉमर्स कंपन्या व त्यांच्या लॉजिस्टिक सहयोगींच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठीच डिझाइन करण्यात आली आहे. हे वाहन त्यांना अगदी शेवटच्या स्थळापर्यंत शाश्वत डिलिव्हरीची सोय देते. हे वाहन चालवण्याचा खर्च प्रती किलोमीटर ५० पैसे एवढा कमी असल्याने डिलिव्हरीचा खर्चही खूप कमी होणार आहे. आमच्या नवोन्मेषकारी सफर जम्बोला या ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. आम्ही अनेक कंपन्यांसोबत प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू केले आहे. नोव्हेंबरपासून आम्ही सफर जम्बोच्या माध्यमातून व्यावसायिक पुरवठा सुरू करणार आहोत. येत्या ६-७ महिन्यांत आम्ही ५,०००हून अधिक वाहने घरपोच सेवा देऊ लागतील, असे अपेक्षित आहे. आम्ही गॅस सिलिंडर वितरण, कचरा संकलन यांसारख्या विविध उपयोजनांसाठी या वाहनाचे वेगवेगळे प्रकार हळूहळू बाजारात आणणार आहोत आणि या वाहनांच्या माध्यमातून आम्ही भारताला पर्यावरणपूरक करण्यात मोठा हातभार लावू शकू अशी आशा वाटते! आमची समूह कंपनी कायनेटिक मोबिलिटी निवडक ग्राहकांना “भाडेतत्त्वावर” ई-कार्गोचा ताफाही देऊ करणार आहे. त्यायोगे या संकल्पनेचे बीज पेरले जाईल आणि एकदा का ग्राहकांना ई-वाहतुकीच्या लाभांचा अनुभव आला की त्याचा प्रसार वणव्यासारखा होईल!”

Leave a Reply

%d bloggers like this: