साहित्यक्षेत्राने काळानुसार बदलायला हवे : श्रीरंग गोडबोले 

मसापमध्ये मोरेश्वर नांदुरकर स्मृती पुरस्काराचे वितरण

पुणे : एकेकाळी दिवाणखान्यात पुस्तकांनी भरलेले कपाट असणे हे समाजात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते. आता दिवाणखान्यात स्मार्ट टीव्ही असणे हे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. समाजाची बदलत चाललेली मानसिकता चिंताजनक आहे. अशा काळात वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी साहित्य क्षेत्राने काळानुसार बदलायला हवे. असे मत प्रसिद्ध गीतकार आणि निर्माते श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि नांदुरकर कुटुंबीय याच्या वतीने संपादन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठीचा या वर्षीचा मोरेश्वर नांदुरकर संपादक उत्तेजन पुरस्कार नीता कुलकर्णी (पुणे) यांना आणि पुस्तक विक्रीच्या उत्तम कामगिरीसाठीचा मोरेश्वर नांदुरकर पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार नाशिकच्या पुस्तक पेठेचे निखिल दाते यांना  गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,  प्रमुख  कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी, मोरेश्वर नांदुरकर यांच्या पत्नी सुनीता नांदुरकर, मुलगी धनश्री कुलकर्णी, रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर आणि सहयोगीचे योगेश नांदुरकर यावेळी उपस्थित होते.

गोडबोले म्हणाले, नवे पुस्तक हातात घेऊन वाचणे हा वेगळाच अनुभव असतो. आजच्या वाचकांना ऑडिओ बुकच्या माध्यमातून वाचनाचा आनंद मिळवावा वाटतो उद्या एखादें नवीन माध्यम आल्यास ते ही  स्वीकारण्यासाठी साहित्य क्षेत्राने अद्ययावत असायला हवे.

प्रा. जोशी म्हणाले, साहित्याची वृद्धी आणि समृद्धी जसजशी वाढत जाते त्याचा संकलित परिणाम म्हणून निर्मिती आणि वाचन अशा दुहेरी सृजनशील प्रक्रियेत संपादन कार्याची गरज निर्माण होते. संपादित वाङ्मय हे समाजाच्या वाङ्मयीन अभिरुचीची विविधता दाखवते संपादकांकडे वैचारिक शिस्त, व्यासंग, परखडपणा  आणि लेखकाशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य असायला हवे. गेल्या काही दिवसांपासून गावोगावी होणारी पुस्तक प्रदर्शने बंद पडली आहेत. ती सुरू होण्यासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेते आणि साहित्य संस्थांनी एकत्र यायला हवे, महाराष्ट्र साहित्य परिषद त्यासाठी पुढाकार घेईल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मिलिंद कुलकर्णी यांनी नीता कुलकर्णी आणि निखिल दाते यांच्याशी संवाद साधला. उमेदीच्या काळात मिळालेल्या या पुरस्कारामुळे कामाचा हुरूप वाढेल अशी भावना  त्यांनी व्यक्त केली. प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. शैलेश नांदुरकर यांनी पुरस्कारामागची भूमिका सांगितली. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: