BSNL कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांकडून मुंबईत विशाल धरणे आंदोलन

प्रलंबित बिलांच्या मागण्यासाठी केली तीव्र निदर्शने, थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचा प्रयत्न करू मुख्य महाप्रबंधक यांचे आंदोलकांना आश्वासन

मुंबई – भारत संचार निगम लिमिटेड कंपनीकडे एसएमएमई अंतर्गत नोंदणीकृत ठेकेदारांना बीएसएनएल कडून केलेल्या कामाचे पैसे गेले वर्षभराहून अधिक कालावधीसाठी न मिळाल्यामुळे राज्यातील कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदारांनी मुंबईतील प्रशासकीय भवनांवर तीव्र आंदोलन केले. नियमानुसार 45 दिवसांच्या आत केलेल्या कामाचे बिल मिळणे अपेक्षित असताना कंपनीकडून अनेक दिवस ही बिले प्रलंबित ठेवण्यात आलेली आहेत. ही बिले तातडीने अदा करण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई येथील भारत संचार निगम कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनासाठी राज्यभरातून ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते. 2016 ते 2019 या कालावधीमध्ये भारत सरकारच्या आदेशानुसार राज्यात एनएफएन प्रकल्प अंतर्गत ऑप्टिकल फायबरची केबल जोडण्याचे काम करण्यात आलेले होते. शासनाच्या सर्व अटी शर्तींचे पालन करून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मागील वर्षभरापासूनची बिले ठेकेदारांना बीएसएनएल कडून देण्यात आलेली नाहीत. त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करून देखील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. बीएसएनएल कडून केलेल्या कामांची बिले अदा न करता दुसऱ्या टप्प्यात खासगी ठेकेदारांकडून ही कामे केली जात आहेत. तसेच त्यांच्या बिलांची रक्कम देखील त्यांना वेळेवर मिळत आहे. कंपनीकडून कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदारांना प्रलंबित बिले न मिळणे यामध्ये काहीतरी “गौडबंगाल” असल्याचा संशय आहे. सरकारने तसेच बीएसएनएलने ठेकेदारांची ही व्यथा लक्षात घेऊन दहा दिवसांच्या आत प्रलंबित बिले अदा करावीत अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांनी मुख्य महाप्रबंधकांकडे केली. अन्यथा नाईलाजास्तव कुटुंबांसह कंपनीच्या मुंबई विभागीय कार्यालया बाहेर आंदोलनासाठी बसावे लागणार आहे असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.
राज्यभरातून आलेल्या कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदारांची भावना समजून घेण्यासाठी मुख्य महाप्रबंधक मनोज मिश्रा यांनी यावेळी आंदोलकांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. त्यानंतर प्रत्यक्ष सर्व आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्यास विनंती केली. कंपनी कडील सर्व प्रलंबित बिलांच्या रकमा लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदारांना अदा केल्या जातील त्यासाठी तातडीने प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी मुख्य महाप्रबंधक यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: