महिला सक्षमीकरणातील ‘सुदर्शन’चा पुढाकार कौतुकास्पद – अदिती तटकरे

रायगड : “उत्पादन विभागात कामाची जबाबदारी मुलींवर टाकण्याचा सुदर्शन केमिकल्सचा निर्णय धाडसी आहे. उत्तम काम करण्याची मानसिकता, चिकाटी मुलींमध्ये अधिक असते. सुदर्शनने घालून दिलेले हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे इतर कंपन्याही महिलांना प्राधान्याने नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतील. कागदी पिशव्या बनविण्याचा प्रकल्प, महिला बचत गटांना दिलेले प्रोत्साहन आणि प्लांटमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये महिलांना दिलेली कामाची संधी यातून महिला सक्षमीकरणात ‘सुदर्शन’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले. कोरोना काळात मास्क शिवण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून, कापडी पिशव्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला, असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सुदर्शन केमिकल्समध्ये उत्तम काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘नारीशक्ती सन्मान’ पुरस्कार त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यावेळी अदिती तटकरे बोलत होत्या. कोरोना काळात जीव धोक्यात घालून जनजागृतीचे काम करणाऱ्या पत्रकारांनाही कोरोनायोद्धा म्हणून गौरविण्यात आले. धाटाव (ता. रोहा) येथील सुदर्शन केमिकल्सचा आवारात झालेल्या या सोहळ्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार कविता माने, प्रांताधिकारी यशवंत माने, पोलीस निरीक्षक नितीन बंडगर, सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी, सीएसआर हेड शिवालिका पाटील, प्लांट हेड संजय शेवडे, वरिष्ठ व्यवस्थापक (सीएसआर) माधुरी सणस, स्थानिक लोकप्रतिनिधी विनोद पाशिलकर, विजयराव मोरे आदी उपस्थित होते.

अदिती तटकरे म्हणाल्या, “रोहासह रायगड जिल्ह्याच्या विकासात सुदर्शनने योगदान दिले आहे. शहरी, ग्रामीण, दुर्गम अशा तीन भागात रायगड विभागला आहे. त्यामुळे कंपन्यांना विस्तार करताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी चांगले औद्योगिक धोरण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोजगार निर्माण करून देण्यासाठी अनही प्रयत्न करत आहेत. समानता हाच सामाजिक विकासाचा महत्वाचा धागा आहे. औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा अशी ओळख निर्माण व्हावी. कोरोनाने अनेक नवे शब्द दिले. येथे स्वच्छता आणि सुरक्षित उपाय कौतुकास्पद आहेत. कोविड सेंटर, व्हेंटिलेंटर आदी गोष्टीत सुदर्शनसह इतर कंपन्यांची चांगली मदत झाली.”

राजेश राठी म्हणाले, “सुदर्शनने सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचे ध्येय ठेवले आहे. सद्यस्थितीत महिलांना समान संधी देण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. आज या गुणवान महिला सहकाऱ्यांचा सन्मान करताना आनंद होतो आहे. महिलानी केवळ कार्यालयीन काम करावे, ही मानसिकता बदलत असून, उत्पादन, तंत्र यंत्रणा, प्लांट अशा सर्व ठिकाणी उत्तम काम करत आहेत. रसायन क्षेत्रात काम असल्याने पर्यावरण संवर्धन यावरही आम्ही काटेकोरपणे लक्ष देत आहोत. कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यासह सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली गेली.”

निधी चौधरी म्हणाल्या, “प्लांटमध्ये मुली काम करताना पाहून मला आनंद झाला. कंपनीच्या आवारात केलेले पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, योग्य प्रकारे घेतलेली काळजी समाधानकारक आहे. शिक्षण, लग्न, जमेल ती नोकरी न करता आपली आवड जोपासून काम करायला हवे. आयुष्यात योग्य ध्येय ठेवून आपण काम करावे. चांगली स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी. या प्रवासात आपल्याला थांबवणाऱ्या अनेक व्यक्ती भेटतील, त्यांना दुर्लक्षित करून आपण आपले ध्येय पूर्ण करावे. महिला काम करतात, तेव्हा ते उत्तम दर्जाचे काम होते. सख्यांनो, चांगले आणि मानापासून काम करा.”

स्वागत प्रास्ताविक शिवालिका पाटील यांनी केले. अंकिता मांढरे यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी सणस, ऍड. विशाल घोरपडे, रुपेश मारबते, अमित भुसारे, नीरजा कोटे यांनी सोहळ्याचे संयोजन केले. आभार संजय शेवडे यांनी मानले.

या महिलांचा झाला सन्मान
बेस्ट वुमेन टेकनिशिएशन ऑफ द इयर सन्मान प्रियांका पाटील, प्रगती कर्णेकर, उल्लेखनीय योगदानाबद्दल चंदा रटाटे, बेस्ट आयडिया सन्मान दीपिका दळवी, मंचिता ठाकूर, समीक्षा कडव, बेस्ट प्रेजेंटर दीप्ती गावंड, बेस्ट एक्सिक्युटर अंकिता पाटील, प्रगती जाधव, मंजुळा मोहिते या महिलांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: