fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTPUNE

मेकअपच्या माध्यमातून पल्लवी तावरे करणार समाजजागृती!

समाजात महिलांच्या रूपाने अनेक देवीरुपी स्त्रिया आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. भारतीय संस्कृतीत देवींच्या धाडसी आणि पराक्रमी लढायांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देवलोकात देवदेवतांना अनेक संकटांचा सामना करून आपले स्थान निर्माण करावे लागते. भूलोकात संकटांची रूपं बदलली असली तरी संघर्ष तोच आहे. क्षेत्र कोणतेही असो, स्त्रियांच्या स्वभावात असलेला सृजनशीलतेचा आणि समर्पणाचा गुणधर्म त्यांना नेहमी अव्वल स्थान प्राप्त करून देतो.

या पार्श्वभूमीवर आयोजक पल्लवी तावरे यांनी नवरात्री विशेष एक आगळी वेगळी संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. यामध्ये नऊ दिवस नऊ स्त्रियांच्या रुपात वेगवेगळ्या पद्धतीने मेकअप करून देवींच्या रूपांचे सादरीकरण केले जाणार आहे. कोरोनाच्या काळात स्त्रियांवर होणारे छुपे अत्याचार, हाथरससारख्या बलात्काराच्या घटनांच्या बळी ठरणाऱ्या निष्पाप स्त्रिया, सद्यस्थितीला मानसिक आजाराशी लढणारे जीव, कोरोनाच्या भयंकर आजाराने निधन पावलेले जीव, नाजूक काळात आरोग्याची हेळसांड या आणि अशा अनेक सामाजिक विषयांना समोर ठेवून समाज जागृती करण्याचा या सौंदर्य रचनेचा हेतू आहे.

समाजातील वाईट घटनांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आपापल्या क्षेत्रांतून समाजाला योग्य-अयोग्य गोष्टींबाबत जागरूक करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. शृंगार साधनेतून समाजाचे प्रतिबिंब दाखवण्याची ही वैचारिक संकल्पना याच विचारातून आली आहे. शृंगार म्हणजे केवळ दिखाऊ आकर्षण नव्हे तर शृंगारातून मानवी आयुष्याचे अनेक पैलू दर्शवता येतात. शृंगाराच्या माध्यमातून इतर नौरसांचे प्रदर्शन करता येते, असे मत पल्लवी तावरे यांनी मांडले.

पल्लवी तावरे म्हणतात, आम्ही या संकल्पनेला नवरात्रीच्या निमित्ताने समोर आणत आहोत. यामध्ये दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, देवी सरस्वती, कालिकामाता, देवी अंबाबाई, कात्यायनी देवी, वज्रेश्वरी, सिद्धिदात्री आणि नारायणी या देवींच्या रुपांना मेकअपच्या माध्यमातून पुनर्निर्मित करणार आहोत.

हिंदू परंपरेत देवतांचे स्थान अढळ आहे. लक्ष्मी, ही संपत्तीची देवी मानली जाते. प्रामाणिक व्यक्तीकडे लक्ष्मी सुखाने नांदते. दुसरी देवी सरस्वती, ही ज्ञानाची देवी आहे, तिसरी देवी दुर्गा, ही शक्तीची देवी मानली जातात. कालिका माता ही धर्मरक्षण आणि पापी राक्षसांचा वध करणारी म्हणजेच काळया शक्तींचा नाश करणारी देवी मानली जाते. तर, देवी अंबाबाई ही सर्व जीवांची रक्षक मानली जाते. तसेच कात्यायनी देवीची आराधना केल्यास आजार, दुःख, भीती नष्ट होते. देवी सिद्धादात्रीची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. या देवतांचे सादरीकरण शृंगाराच्या रुपात समोर आणणारं असून नारी तू नारायणी हा विचार जपत नारायणी देवीच्या रूपातही शृंगार केला जाणार आहे.

या उपक्रमामध्ये आयोजक आणि मेकअप कलाकार म्हणून पल्लवी तावरे यांनी भूमिका पार पाडली आहे. याशिवाय या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी छायाचित्रण, व्हिडिओग्राफी, स्टायलिस्ट आणि इतर तयारीसाठी पल्लवी तावरे ,शीतल सूर्यवंशी जिजा ज्वेलरी,ऋषिकेश तापडिया,किशोर पाटील ,सुमेष कुलकर्णी,सुमय्या पठाण या सहा लोकांची टीम कार्यरत होती. या संकल्पनेच्या माध्यमातून या कठीण काळात अनेकांचे मनोधैर्य वाढवून, नकळतपणे त्यांना सकारात्मक करण्याचा आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading