fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

कलाकार त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो – ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये

पुणेः- कलाकार शरीररुपाने निर्वतले तरी कलाकार त्याच्या कलेतून आणि कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो. त्याची कला सदैव आपल्या मनात रुंजी घालत असते, असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी व्यक्त केले.

भारतीय अभिजात रागसंगीतामध्ये मेवाती घराण्याच्या गायकीची धुरा समर्थपणे वाहिलेले संगीतमार्तंड पं. जसराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ललित कला केंद्र ( (गुरूकुल), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भीमसेन जोशी अध्यासन आणि संवाद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सांगितीक श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी उपाध्ये बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर होते. या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, संवाद पुणेचे सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे ( (गुरूकुल) प्राध्यापक आणि विभागप्रमुख डाॅ. प्रवीण भोळे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले की, पंडित जसराज यांचा स्वर प्रासादिक होता. मेवाती घराण्याची पंरपरा पंडित जसराज यांनी चालवली. पंडित जसराज यांची गायनाची मांडणी अतिशय सुसंबंध होती आणि त्यात एक नजाकत होती. पंडित भिमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे, अभिषेकी बुवा यांसारख्या दिग्गजांच्या सान्निध्यात आम्ही वाढलो. या सान्निध्यामुळेच आमची देखील कला समृद्ध झाली. पंडित जसराज हे मूळ तबलावादक होते. त्यांनी एका गायकाच्या स्वरांवर मत प्रदर्शित करतातच दुसऱ्या एका कलाकाराने त्यांना ”तुम तो मरी हुॅयी चमडी बजांते हो, तुम्हे क्या मालूम गंधार के बारे में” असा खोचक टोमणा मारला. ह्या टोमण्यामुळेच पंडित जसराज पेटून उठले आणि त्यांनी त्या दिवसापासून तपस्या करुन गायन क्षेत्रात स्वतःचे वेगळ अढळ स्थान निर्माण केले. जयपूर घराणे, किराणा घराणे म्हणजे हा एक सांगितीक विचार आहे आणि हा विचार पुढे नेणारी पिढी तयार झाली की घराण्याची पंरपरा सुरु होते. या सर्व घराण्यात भविष्यात मेवाती घराण्याला देखील मानणारी पिढी तयार होईल, यात शंका नाही. पंडित जसराज यांनी त्यांच्या जागतिक आणि दूरदृष्टीमुळे संगीत जगतात मोठे योगदान दिले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले की, माझे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. त्यावेळी जगदीश खेबुडकरांसारखे दिग्गज साहित्यीक आम्हाला शिकवायला होते. तसेच 1982 साली उच्चशिक्षणासाठी पुणे विद्यापीठात आल्यानंतर याच सभागृहात भिमसेन जोशी यांनी ऐकण्याची अनेकदा संधी मिळाली. त्या पंरपरेचा वारसा लाभला असल्याने आता पुणे विद्यापीठाचा कुलगुरु या नात्याने तीच परंपरा आम्ही पुढे नेत आहोत.संगीत क्षेत्रात योगदान देऊ शकलो नसलो तरी या दिग्गजांच्या सान्निध्यात आल्याने कानसेन होत भारतीय शास्त्रीय संगीताचा आनंद घेत आलो आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्रीनिवास भीमसेन जोशी म्हणाले की, वडिल भिमसेन जोशी यांच्यामुळे पंडित जसराज यांना जवळून अनुभवण्याचा योग आला. गायन क्षेत्रात अनेक कलाकार साधना करीत असतात. पंरतू, परतत्वस्पर्श काहीच कलाकारांना प्राप्त होतो. परतत्वस्पर्श लाभलेल्या मोजक्या काही कलारकारांमध्ये पंडित जसराज यांचे नाव अग्रक्रमाने येते.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले की, पुणे विद्यापीठाने सामाजिक उत्तरदायीत्व लक्षात घेत इतर सहभागी संस्थांसह पुढाकार घेऊन सांस्कृतिक शहर असलल्या पुणे शहरात पंडित जसराज यांना पहिल्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले. श्रद्धांजली सभेद्वारे संगीत आणि कलेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या दिग्गजांच्या योगदानाचे स्मरण करणे हा या मागील हेतू आहे. अशाच उपक्रमशिलतेद्वारे समाजाप्रती असलेली संवेदनशीलता पुणे विद्यापीठातर्फे कायमच जपली जाईल.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी यांनी ही थोडक्यात मनोगत व्यक्त केले. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे ( (गुरूकुल) प्राध्यापक आणि विभागप्रमुख डाॅ. प्रवीण भोळे यांनी या श्रद्धांजली सभेच्या आयोजनात पुणे विद्यापीठाची असलेली भूमिका विषद केली. निकीता मोघे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात शब्दसुमनांनी झालेल्या श्रद्धांजलीसभे नंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात
डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर, चंद्रशेखर स्वामी आणि पंडित जसराज यांचे शिष्य हेमांग मेहता यांचे शास्त्रीय गायन झाले.

करोनाच्या पार्श्र्वभुमिवर झालेल्या हा कार्यक्रम संपुर्ण शासकीय निमय आणि चाैकटीतच झाला. तसेच या कार्यक्रमत रसिकांना सहभागी होता यावे म्हणुन रसिकांना हा संपूर्ण कार्यक्रम (Link: webcast.unipune.ac.in आणि https://www.facebook.com/Lalitkalakendra) या लिंकवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading