‘काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत, चीनने शासन करावं अशी त्यांची इच्छा’- फारुख अब्दुल्ला

श्रीनगर – काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत, त्यांना भारतीय व्हायचे नाही. त्याऐवजी चीनने काश्मीरवर शासन करावं अशी त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केलंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करावा अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आलीय. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आम्ही भारतीय आहोत, असं कोणीही सरकारला सांगणारं आढळणार नाही. तु्म्ही या आणि तेथील कोणाशीही बोला, ते (काश्मिरी लोक) स्वत:ला भारतीय देखील मानत नाहीत आणि पाकिस्तानी देखील मानत नाहीत, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. गेल्या ५ ऑगस्टला त्यांनी (मोदी सरकार) जे केले, तो शवपेटीतील शेवटचा खिळा होता, असेही अब्दुल्ला पुढे म्हणाले.

काश्मिरी लोकांचा सरकारवर अजिबात विश्वास नाही. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानात जाणे सोपे होते, मात्र तेव्हा त्यांनी गांधींचा भारत निवडला, मोदींचा भारत निवडलेला नव्हता, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.

आज दुसऱ्या बाजूने चीन पुढे येत आहे. जर तुम्ही काश्मिरी लोकांशी बोललात, तर चीनने भारतात यावे असे अनेक लोक सांगतील. मात्र चीनने मुस्लिमांसोबत काय केले हे त्यांना माहितीही आहे. मी यावर फार गंभीर नाही, मात्र मी प्रामाणिकपणे हे सांगत आहे, मात्र लोक ते ऐकू इच्छित नाहीत, असे अब्दुल्ला म्हणाले.

या वेळी फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जेव्हा केव्हा आपण भारताबाबत खोऱ्यात बोलतो तेव्हा आपले कोणीही ऐकत नाही. तेथे प्रत्येक गल्लीत एके-४७ घेतलेला सुरक्षारक्षक उभा आहे, असे सांगतानाच स्वातंत्र्य आहे कुठे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

Leave a Reply

%d bloggers like this: