fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

शाळा सुरु झाल्यानंतर ‘एसएमएस’, स्वच्छतेचे पालन अधिक गरजेचे

‘लॉकआउटनंतरची शाळा व्यवस्थापन प्रणाली’वर आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर

पुणे : “वेगाने संसर्ग होणाऱ्या कोरोनामुळे आपले नियमित जीवन विस्कळीत झाले. जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत सुधारित जीवन क्रम स्वीकारताना आपली दमछाक होते आहे. जूनमध्ये सुरु होणाऱ्या शाळा ऑक्टोबर उलटला तरी कधी सुरु होतील, याबाबत स्पष्टता नाही. पण शाळा सुरु झाल्या, तर सॅनिटाझर, मास्कचा वापर, सोशल डिस्टेनसिंग (एसएमएस) आणि शाळा परिसर,वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, संबंधित सर्व घटकांची स्वच्छता याचे काटेकोरपणे पालन करणे अधिक गरजेचे असणार आहे,” असा सूर ‘लॉकआउटनंतरची शाळा व्यवस्थापन प्रणाली’वर आयोजित कार्यशाळेत निघाला.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व ‘मार्गदर्शक पुस्तिका कोविड लॉक आउट नंतर मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली’ या पुस्तकाचे लेखक प्रा.राजेंद्रकुमार सराफ, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ सुजाता कोडग, वैद्य प्रशांत सुरु,शिक्षणतज्ज्ञ डॉ. मिलिंद नाईक यांनी मार्गदर्शन केले. शाळा उघडल्यानंतर व्यवस्थापन, पालक, विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मनातील भीती,दडपण यासह त्यांच्या आरोग्याचा धोका, कोविड संक्रमणाचे केंद्र शाळा होऊ नये, शाळा ते घर या प्रवासातील सुरक्षितता अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.

डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, “हळूहळू एकेक गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. मात्र, शाळा सुरु करण्याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. काही देशांनी आधी शाळा सुरु केल्या व मग इतर गोष्टी सुरु करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जागृती केली. परंतु, आपल्याकडील परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. तेव्हा त्याला लक्षात घेऊन आपल्याला शाळा सुरु करताना सुविधांची निर्मिती करावी लागेल. व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना चांगले आणि सुरक्षित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यादृष्टीने अनेक शाळा प्रयत्नही करत आहेत. पालकांनी मनातील नाहक भीती काढून काळजीपूर्वक आपल्या पाल्याना शाळेत पाठवले, तर शाळादेखील सर्व प्रकारची काळजी घेऊन शिक्षण पुन्हा सुरु करण्यास तयार आहेत.”

प्रा. राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, “प्रवेशद्वाराजवळ नोंदणी, तपासणी कक्ष उभारावे लागतील. स्पर्शविरहित हातपाय धुण्यासाठी व्यवस्था,दफ्तरविरहित शाळा, विलगीकरणाची सोय उभारावी लागेल. मास्कचा वापर अनिवार्य करावा लागेल. चक्राकार उपस्थिती, मोकळ्या जागेतील वर्ग सुरु करण्यासह सणवार, सामूहिक प्रार्थना, खेळ याविषयी नियोजन करावे लागेल. वर्गात गुंतवून ठेवावे लागेल. पुस्तकविरहित आधुनिक शिक्षण तंत्राचा वापर वाढवावा लागेल. शुद्ध हवा, पाणी, स्वच्छ परिसर,उपयुक्त औषधी, स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध कराव्या लागतील. ग्रामीण व छोट्या शाळेचे प्रश्न हे वेगळे आहेत व त्याकरता विशेष विचार करावा लागेल. शिक्षक हे समाजाला आदरणीय आहेत व ते नवीन व्यवस्थापन प्रणाली सर्व भागधारकांच्या सहकार्याने सहज अमलात आणू शकतील ” 
“कोरोनाच्या या महामारीत शाळा अधिक जोखीम असणाऱ्या आहेत. शाळा सुरु होण्यापुर्वी आपत्ती व्यवस्थापन योग्यरीत्या करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. स्पर्शविरहित पाण्याचा वापर, सॅनिटायझर स्टॅन्ड, अंतर राखण्यासाठी बैठक व्यवस्था करावी लागेल. मोकळ्या जागेत शाळेचे वर्ग भरविण्याचा चांगला पर्याय आहे. त्यासाठी शाळेकडे मोकळी जागा हवी. शाळेशी संबंधित सर्व घटकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘कोविड समिती’ची स्थापना हवी. विद्यार्थी-शिक्षक वेगवेगळ्या भागात राहतात. त्यांची मानसिकता तयार करणेही तितकेच गरजेचे आहे,”असे मत सुजाता कोडग यांनी मांडले.

वैद्य प्रशांत सुरु म्हणाले, “शिक्षकांना शाळा व्यवस्थापनाशी समन्वय ठेवून स्वतःची काळजी घेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचे आहे. सोबतच त्यांना या धोक्यापासून दूर ठेवायचे आहे. शाळेचे नियमित निर्जंतुकीकरण करावे लागेल. वर्गातील बसण्याची व्यवस्था वर्तुळाकार करावी लागेल. विद्यार्थ्यांना वर्गात बसताना  एकमेकां पासून अंतर ठेवावे लागेल. मुलांच्या हाता पायाची स्वच्छता, वापरण्याचे व पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसरात चिखल होणार नाही,याची काळजी घेणे आदी गोष्टी कराव्या लागतील.”

प्रा सराफ यांनी लवकरच या कार्यशाळेच्या आधारावर मार्गदर्शक पुस्तिका कोविड लॉक आउट नंतर शाळा व्यवस्थापनाची नवीन प्रणाली लिहूण प्रकाशित करण्यात येईल असे सांगितले. या कार्यशाळेत १०० च्यावर शिक्षकांनी सहभाग घेतला होता. सहभागी शिक्षक शाम धुमाळ, श्रीमती मीनाक्षी पवार, श्रीमती अश्विनी भुजबळ, राजेश तायडे, अभयकुमार वनकर, श्रीमती सुनिता थोरात व श्रीमती शामला देसाई इत्यादिनी आपली मते सूचना व प्रश्न सांगितलेत व त्यावर चर्चा झाली. प्रा. विनय र र यांनी समारोप केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading