fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

…तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील

पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनचा मूकमोर्चा व धरणे आंदोलन

पुणे, दि. 7 – ‘आम्ही सारे कलाकार, झालो बेकार’, ‘काम बंद घर कसे चालवू’, ‘व्यवसाय बंद हप्ते कसे फेडू’, ‘सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?’ असे प्रश्न उपस्थित करत पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने मूकमोर्चा व धरणे आंदोलन केले. ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत सगळेच सुरु होतेय, मग केवळ इव्हेंट्सवर बंदी का? त्यानेच कोरोनाचा धोका अधिक आहे का? असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी केला. तसेच सरकारने लवकरात लवकर जाहीर कार्यक्रमांना परवानगी दिली नाही, तर आम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील, असा इशारा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

पुणे कॅम्पातील आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूकमोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

जवळपास दीड ते दोन हजार व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले. तर ५० पेक्षा अधिक विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामध्ये प्रामुख्याने महाकला मंडळ, मंडप ओनर्स वेल्फेअर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड साउंड लाईट असोसिएशन, प्रोफेशनल ऑडिओ अँड लाईट असोसिएशन (पाला), कलाकार महासंघ, पुणे फुलबाजार अडते असोसिएशन, खडकी मंडप असोसिएशन, साउंड लाईट असोसिएशन सातारा, साउंड लाईट असोसिएशन फलटण आदी संस्थांचा समावेश आहे. प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, माजी अध्यक्ष शिरीष पाठक, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, सोमनाथ धेंडे, सूर्यकांत बंदावणे, ‘पाला’चे अध्यक्ष किशोर म्हात्रे, मेहबूब पठाण, उदय शहा, बंडूशेठ वाळवेकर, सचिन नसरे, स्टीवन नॅथन, उदय इनामके, अझीज शेख, मृणाल ववले आदी उपस्थित होते.

असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी म्हणाले, “कोरोनामुळे जवळपास ७ महिने कोणतेही जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत. तर या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या जवळपास चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशांची भ्रांत, थकलेले हप्ते आणि निराशा यामुळे या क्षेत्रातील अनेकजण आत्महत्येचा मार्ग पत्करू लागले आहेत. त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य ओळखून इतर व्यवसायाप्रमाणे अटी-शर्थींसह आम्हालाही जाहीर कार्यक्रम आयोजिण्यास त्वरित परवानगी द्यावी.”

मेघराज राजेभोसले म्हणाले, “इव्हेंट्सना भव्यदिव्य रूप देण्यात या सर्व तंत्रज्ञ कलाकारांचा मोठा वाटा असतो. मात्र, आज कार्यक्रम होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आम्ही सगळे कला क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पाठीशी असून, इव्हेंट्स करण्यास सरकारने परवानगी द्यावी. त्यातून त्यांची उपजीविका पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. तसेच कलाकार, तंत्रज्ञ कल्याण मंडळांची स्थापना करावी, यापुढे असे होऊ नये आणि, तसेच आमच्या व्यवसायाशी निगडीत असलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे.”

सोमनाथ धेंडे म्हणाले, “व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते भरण्यास शिथिलता द्यावी. वाहतुकीसंदर्भात गाड्यांचे पासिंग, इन्शुरन्स, कर भरणा याबात सवलत मिळावी. सर्व तंत्रज्ञाना कलाकाराचा दर्जा मिळावा. व्यावसायिकांना त्यांच्या मुलांच्या शाळा व कॉलेजच्या फीसमध्ये सवलत मिळावी. व्यावसायिकांना आपले साहित्य ठेवण्यासाठी महापालिका हद्दीत जागा किंवा गाळे नाममात्र भाडेतत्वावर उपलब्ध करून द्यावेत. तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने काढून द्यावा.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading