fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

कोरोना रुग्‍णांमध्‍ये सकारात्‍मक जीवनशैलीसाठी उपक्रम- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

पुणे, दिनांक 7- कोविड किंवा कोरोना म्‍हटलं की रुग्‍ण किंवा त्‍याच्‍या नातेवाईकांच्‍या मनात भीती निर्माण होते. वास्‍तविक पहाता कोरोना हा काही जीवघेणा आजार नाही. वेळेवर उपचार घेतले तर कोरोनावर मात करता येऊ शकते. सर्व काळजी, खबरदारी घेतली आणि तरीही कोरोना झाला तर त्‍यावर मात करण्‍यासाठी खंबीर मन करायलाच हवं. कोविड केअर सेंटर मध्‍ये दाखल होण्‍यापासून उपचार होवून ठणठणीतपणे बाहेर पडेपर्यंत रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक चिंतेत असतात. या सर्व बाबींची दखल घेऊन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्‍या निर्देशानुसार कोविड केअर सेंटरमध्‍ये रुग्‍णामध्‍ये सकारात्‍मक जीवनशैलीची अंमलबजावणी करण्‍याबाबत उपाययोजना करण्‍यात येत आहेत.

याच उपक्रमाचा एक भाग म्‍हणून कोरोनाबाधित असताना सकारात्मक विचारशैली कशी ठेवावी, योग, योगाचे फायदे व याबद्दल योग शिक्षक दिलीप गायकवाड यांनी तळेगाव दाभाडे येथील रुग्‍णांना मार्गदर्शन केले. यावेळी योगसाधना वर्ग घेण्‍यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, कोविड समन्वयक गुणेश बागडे उपस्थित होते. तळेगाव दाभाडे (तालुका मावळ) येथील कोविड केअर सेंटरमध्‍ये रुग्णांच्‍या मनात भीतीचे वातावरण निर्माण होवू नये यासाठी नेहमी रुग्णाच्या मनोरंजनाकरिता वेगवेगळे बैठे किंवा मैदानी उपक्रम राबविले जातात. यानुसार अंताक्षरी, रुग्णांच्या आवडीनुसार गीत गायन, संगीतावर नृत्‍य आणि नेहमीप्रमाणे व्यायाम, स्वच्छता करण्यात येते. रोज दुपारी रुग्णांसाठी विविध उपक्रम या केंद्रात घेतले जातात. त्‍यामध्‍ये प्रबोधनपर व उत्साह वाढवणारी व्याख्याने, संगीत खुर्ची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पास पिलो, गायन, विविध कृती करणे, निबंध स्पर्धा, रुग्‍णांपैकी कुणाचा वाढदिवस असेल तर शुभेच्‍छा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या मनोरंजनपर उपक्रमांमुळे रुग्‍णांच्‍या आजाराबद्दलची संपूर्ण भीती निघून जाते, रुग्णांचा आजार कधी बरा होतो हे त्यांनाही कळत नाही, मानसिकरित्या ते खूप मजबूत राहतात, बरे होण्‍याचे प्रमाण खूप छान आहे, रुग्ण स्वतः नवीन गोष्टी शिकतो व इतरांना देखील शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष म्‍हणजे सर्व नियम, अटी पाळून रुग्ण स्वतः उत्साहाने सहभाग घेतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading