‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामाने आठ दिवसात पार केला 1 मिलियनहून अधिक व्हुजचा टप्पा

भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. कोणताही उत्सव हा सार्वजनिक म्हणजेच समाजाला एकत्र घेऊन साजरा करायला आपल्याला आवडते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या, आगामी  नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा प्रशासनाने नियम व अटी घालून दिल्या आहेत. कोरोना संकटाचा  सर्वाधिक परिणाम नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवावर झाला. पुण्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आहे. पुणेकरांनी या संकटकाळात प्रशासनाला सहकार्य करत, नियमांचे पालन करत गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. डॉक्टर, प्रशासन आणि पुणेकरांच्या संवेदनशीलतेला ‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामा मधून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टूडिओज’च्या वतीने सलाम  करण्यात आला आहे. या डॉक्युड्रामाला पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या 8 दिवसात ‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामाने 1 मिलियनहून अधिक व्हुजचा चा टप्पा पार केला आहे.

महेश लिमये दिग्दर्शित “पुनरागमनाय च- गणेशोत्सव २०२०, एक उत्सव मनात राहिलेला” या डॉक्युड्रामामध्ये आजवर न बघितलेल्या गणेशोत्सवाचे उत्कट चित्रण बघायला मिळते. लेखक क्षितिज पटवर्धन आणि डिओपी- दिग्दर्शक महेश लिमये यांनी गणेशभक्तांच्या नेमक्या भावना यामध्ये टिपल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

निर्माते पुनीत बालन म्हणाले,‘पुनरागमनाय च’ या  डॉक्युड्रामाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर्स, पोलीस, महापालिका प्रशासन आणि पुणेकरांना त्यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल मानवंदना दिली आहे. या उपक्रमाला पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांनी दिलेला प्रतिसाद आम्हाला चांगल्या सामाजिक कार्यासाठी अधिकाधिक प्रेरणा देणारा आहे.

‘पुनीत बालन स्टुडिओज’ची जनहितार्थ निर्मिती असलेल्या ‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामाची संकल्पना निर्माते पुनीत बालन, लीड मीडियाचे विनोद सातव यांची आहे, या डॉक्युड्रामासाठी पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (IPS) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. ‘पुनरागमनाय च’ हा डॉक्युड्रामा ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इनस्टाग्राम पेज आणि पुणे पोलिसांच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर विनामूल्य पाहता येतो.

Leave a Reply

%d bloggers like this: