IPL 2020 – मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय

दुबई – मुंबई इंडिन्सने आपली विजायाची परंपरा कायम ठेवली आहे. सनराईजर्स हैदराबादवर मुंबई इंडिन्सने ३४ धावांनी मात करून शारजाच्या मैदानावर आपली छबी उमटवली आहे. हैदराबादला २०९ धावांचं आव्हान होतं, मात्र त्यांनी १७४ पर्यंतच आपली छाप पाडली. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनीही या सामन्यात टिच्चून मारा करत हैदराबादला फार मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.

हैदराबादच्या डावाची आश्वासक जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने सुरुवात केली. बेअरस्टोला माघारी धाडत मुंबईला पहिलं यश ट्रेंट बोल्टने मिळवून दिलं. यानंतर मनिष पांडे आणि वॉर्नर यांनी पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावणार असं वाटत असतानाच मनिष पांडे जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३० धावांची खेळी केली. यानंतर हैदराबदच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. एकीकडे कर्णधार वॉर्नर फटकेबाजी करत असतानाही केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरही पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर इशान किशनकडे झेल देत माघारी परतला. त्याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या.

हैदराबादला जिंकवण्यासाठी अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराहने यांनी प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.

त्याआधी, क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत कायरन पोलार्ड व पांड्या बंधूंनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०८ धावांपर्यंत मजल मारली. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत चांगला मारा केला. परंतू अखेरच्या षटकांत मुंबईच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. डी-कॉकच्या ६७ धावा हे मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं.

Leave a Reply

%d bloggers like this: