महराष्ट्राच्या बाैद्धिक आणि वैचारीक भरणपोषणात प्रकाशकांची भूमिका मोलाची – महापाैर मुरलीधर मोहोळ


पुणे ः- पुण्याचे नावलाैकिक होण्यात अनेक घटकांचा हातभार असतांना पुण्यातील लेखकांचे विचार संपुर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर पोहचविण्यात पुण्यातील प्रकाशकांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे. महराष्ट्राचे बाैद्धिक आणि वैचारीक भरण-पोषण करण्यात प्रकाशकांची भूमिका मोलाची आहे, असे मत पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

दिलीपराज प्रकाशनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि सुवर्ण महोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण आज महापौर मोहोळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुवर्ण महोत्सव समितीचे सदस्य अॅड. प्रमोद आडकर, दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे, मधुमिता बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीपराज प्रकाशनातर्फे पुणे महानगरपालिकेच्या जंबो कोविड सेंटरला एक लाख रूपये किंमतीची पुस्तके देणगी रूपात भेट देण्यात आली.

यावेळी महापौर मोहोळ म्हणाले की, भारतातील इतर राज्यांची महाराष्ट्राशी तुलना केली असता महाराष्ट्र तसे शांतताप्रिय राज्य असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राला वैचारिक लढ्याची पार्श्वभुमी लाभलेली असून महाराष्ट्राचा वैचारिक पाया पक्का आणि भक्कम करण्यात प्रकाशक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. पुण्याने संपूर्ण महाराष्ट्राला अनेक नामवंत लेखक , विचारवंत दिले. त्यांचे माैलिक विचार आणि शब्दसुमने प्रकाशकांनी त्यांच्या वितरणव्यवस्थेच्या यंत्रणेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविले. महाराष्ट्र सहिष्णु बनविण्यात प्रकाशकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभारच लावला आहे. आजही करोना सारख्या महामारीशी लढा देत असतांना अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना पुढे आल्या. त्यांच्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला. संकट काळात सर्वांची एकत्रीत ताकद करोना सारख्या महामारीला देखील पळवून लावेल यात शंका नाही. या संकट काळात पुणेकरांनी जपलेले सामाजिक भान पाहिले की आपण या पुण्यनगरीचे महापाैर आहोत या अभिमानाने ऊर भरून येतो. दिलीपराज प्रकाशनाने देखील त्यांची सामाजिक बांधिलकी पाळत साधेपणाने कार्यक्रम घेत कोरोना ग्रस्तांसाठी एक लाखांची पुस्तके भेट दिली, हे कौतुकास्पद आहे.

प्रा.मिलिंद जोशी म्हणाले की, करोना हा केवळ शारीरिक आजार राहिलेला नाही तर करोनामुळे अनेक मानसिक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. मानसिक स्वास्थ्य स्थिरस्थावर असल्याशिवाय अाैषधोपचार देखील अपेक्षित परिणाम देत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी पुस्तके उपयोगी पडतील यात शंका नाही. अन्न, वस्त्र निवारा या मुलभूत गरजांसोबत मानसिक आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने पुस्तके देखील तितकीच अावश्यक मुलभूत गरज आहे, हे आपण मान्यच करायला तयार नाही. संकट काळात पुस्तकेच धावून येतात. करोनाच्या संकंटामुळे नागरिक पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळू लागले आहेत, हे शुभचिन्ह आहे. समाजाने ज्ञानाभिमुख आणि वाचनाभिमुख व्हावे, यासाठी दिलीपराज प्रकाशनाचे संस्थापक प्रा. द.के. बर्वे या तत्विनिष्ठ प्राध्यापकाने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नात गेली 39 वर्षे राजीव बर्वे सक्षमपणे पुढे नेत असून या प्रकाशनाची धुरा मधुर आणि मोहित बर्वे यांच्या रूपाने तिस-या पिढीकडे सोपवित आहेत. बर्वे कुटुंबिय म्हणजे पुस्तकांचा संसार करणारे कुटुंब आहे. सुरूवातीला बालसाहित्यावर लक्ष्य केंद्रित केलेल्या या प्रकाशनाने कालांतराने ललित साहित्यासह रुंदावत चाललेल्या ज्ञानकक्षांचा वेध घेत प्रकाशन व्यवसायाला नवीन दिशा दिली आहे. कोरोनाच्या भीतीतून आलेल्या निराशेपोटी मने काळवंडून गेली आहेत. त्या भय आणि निराशाग्रस्त समाजाचे उत्थापन पुस्तकेच करू शकतील. ज्या पद्धतीने कोरोनाग्रस्तांसाठी जंबो हॉस्पीटलची उभारणी केली आहे, त्याप्रमाणे सकारात्मक उर्जेचे बिजारोपण करण्यासाठी जंबो वाचनालये उभारावीत. शरीराच्या पोषणासाठी अन्न घटक आवश्यक असतात, त्याच प्रमाणे मन आणि बु्द्धीच्या भरण पोषणासाठी पुस्तकरूपी जीवनसत्वे आवश्यक आहेत.

यावेळी दिलीपराज प्रकाशनाची भूमिका संचालक राजीव बर्वे यांनी मांडली. तर आगामी वर्षातील उपक्रमांची माहिती मधुमिता बर्वे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्ण महोत्सव समितीचे सदस्य अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. मधूर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. मोहित बर्वे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: