Saturday, June 20, 2026
PUNE

पुणे महापालिका आरोग्य प्रमुख पदी डॉ. नितीन बिलोलीकर; गोपाळदादा तिवारी यांच्या मागणीची राज्य शासनाने घेतली तात्काळ दखल

पुणे, दि. 25 – शहरात कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढत असताना महापालिका आरोग्य प्रमुख रजेवर गेल्याच्या पार्श्वभूमीवर शहराला तातडीने पर्यायी आरोग्य अधिकारी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही राज्य शासनाने केली आहे. डॉ. नितीन बिलोलीकर यांना प्रतिनियुक्तीवर महापालिकेत पाठविण्यात आले आहे.

राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून घेतलेल्या वेबिनार चर्चेची दखल घेऊन व पुणेकरांची मागणी लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने डॉ. नितीन बिलोलीकर यांची पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

याबाबाबत बोलताना गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले, “सद्य स्थितीतील पुणेमनपातील आरोग्यप्रमुखांची तीव्र गरज लक्षांत घेऊन डाॅ. नितीन बिलोलीकर यांची ‘वैद्यकीय आरोग्य अधिकारी’ नियुक्ती केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने आभार मानतो.”

शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याची गंभीर स्थिती असताना आरोग्य प्रमुख वैधकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत. तर सहायक आरोग्य प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रजेवर आहेत, ही काळजीची बाब आहे. त्यामुळे तातडीने पर्यायी आरोग्य अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली होती. आरोग्यप्रमुख डॉ रामचंद्र हंकारेना कोरोना’ प्रादुर्भाव झाला नसतांना व वर्क फ्रॉम होमची सुविधा असतांना अशा ‘बिकट प्रसंगी’ आरोग्य प्रमुखांची रजा मान्य करणे, मनाला पटणारे नाही असे तिवारी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, ‘राजीव गांधी स्मारक समिती’तर्फे नुकतेच ऑनलाइन चर्चासत्र घेऊन कोरोना रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून विविध पातळ्यांवर प्रशासनाकडे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. अनंत फडके, फत्तेचंद रांका, नगरसेवक रवींद्र माळवदकर, डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. जयश्री तोडकर, रुबीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय पठारे, दीनानाथ हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. अभिजीत मोरे, सहयाद्रीचे डॉ. सुनील राव, माजी आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. परदेशी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading