छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला नाही -उदयनराजे भोसले
नवी दिल्ली – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यावेळी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत हे राज्यघटनेला धरून नाही, तुम्ही फक्त शपथ घ्या, अशी भूमिका मांडली. त्यावरून हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे अशी आरोळी देत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

त्यावर खुद्द उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही, राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होण्यासारखे काहीही घडलेले नाही, त्यामुळे नसलेल्या मुद्यावरून गोंधळ घालू नये, असे स्पष्टीकरण दिले आहे.
‘जो तो त्या त्या भाषेत शपथ घेईल. ज्याने आक्षेप घेतला, त्याने सांगितलं की हे राज्यघटनेला धरून नाही. त्यावर वाद झाले. माझी प्रामाणिकपणे सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती. याआधी शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. अनेकांनी मी महाराजांच्या कुटुंबातला नाही असंही सांगितलं. जर महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसणार्यांमधला नाही. तिथेच राजीनामा देऊन टाकला असता; पण जे घडलंच नाही, त्याला राजकारणाचा मुलामा देऊन लोकं म्हणत असतील की असं काही झालं, तर ते तसं झालेलं नाही. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. महाराष्ट्रात देखील अनेकांनी आपापल्या पद्धतीने शपथ घेतली. त्यामुळे यावरून राजकारण करू नये अशी विनंती आहे’, असं ते म्हणाले.
