Sunday, June 21, 2026
BLOG

‘पत्रकार’ होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तमाम मैत्रिणींनो आणि मित्रांनो…यंदा नकोच!

सप्रेम नमस्कार.

देशातल्या सार्वकालिक महान तीन मराठी संपादकांची उदाहरणं तुमच्यापुढं ठेऊ इच्छितो.

1) बाळशास्त्री जांभेकर
इंग्रजांच्या राजवटीला आरंभ झाला त्या काळात बाळशास्त्रींचा उदय झाला.
हा माणूस बुद्धिमान आणि अष्टपैलू. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नेटीव्ह सेक्रेटरी पदासाठी फर्ड्या इंग्रजीत अर्ज केला. त्यात त्यांनी ”स्वतःला संस्कृत, इंग्रजी, मराठी, उच्च गणित, भूगोल, गुजराती, बंगाली आणि फार्शी हे विषय येतात,” असं नमूद केलं होतं. इंग्रज सरकारनं त्यांना डेप्युटी सेक्रेटरी म्हणून तातडीनं नियुक्त केलं हे वेगळं सांगायला नको. दोनच वर्षात ते सेक्रेटरी पदावर चढले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हा मान मिळवणारे ते पहिले मराठी विद्वान होय.

मुंबईचे पहिले गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांच्या स्मरणार्थ पुढं एल्फिन्स्टन कॉलेज काढलं. त्या कॉलेजात शिकवण्यासाठी इंग्लंडहून नामांकित प्राध्यापक मागवण्यात आले होते. पण याच कॉलेजातले पहिले एत्तदेशीय असिस्टंट प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली बाळशास्त्री जांभेकर यांची. महर्षी दादाभाई नौरोजी, थोर गणिततज्ज्ञ प्रा. केरुनाना छत्रे हे बाळशास्त्रींचे विद्यार्थी.

याच विद्वान गृहस्थानं सन 1832 मध्ये ‘दर्पण’ हे मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र चालू केलं तेव्हा त्यांचं वय होत वीस वर्षांचं. मराठी वृत्तपत्रसृष्टीचा जनक असलेल्या या संपादकांचं अवघ्या चौतिसाव्या वर्षी अकाली निधन झालं. पण इतक्या अल्पावधीत त्यांनी केलेलं कार्य अफाट आहे. लक्षात घ्या तो काळ आहे सन 1850 पूर्वीचा. परकी भाषा, परकी संस्कृती घेऊन आलेले इंग्रजी राज्यकर्ते मुंबई इलाख्यावर सत्ता गाजवू लागले होते. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं दुर्मिळ होती. आधुनिक शिक्षण पद्धतीचं बीज रुजायचं होतं. त्यावेळी बाळशास्त्र्यांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदःशास्त्र, नितिशास्त्र या सर्व विषयांमधली पाठ्यपुस्तकं मराठीत लिहून काढली. मुंबई इलाख्यातली विद्याखात्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.

2) लोकमान्य टिळक
इंग्रजांनीच ज्यांचं वर्णन ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असं केलं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय. केसरी आणि मराठी या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या निधड्या पत्रकारितेमुळं लोकमान्यांची धडकी थेट लंडनलाही बसली होती. केवळ लोकमान्यांच्या जाज्वल्य, जहाल लेखणीला घाबरून लोकमान्यांना इंग्रजांनी अनेकदा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. इंग्रजांनी सन 1883 मध्ये कोल्हापुरच्या छत्रपतींना वेडं ठरवून तुरुंगात डांबलं. त्यावर लोकमान्यांनी मराठी ‘केसरी’तून आणि आगरकरांनी इंग्रजी ‘मराठा’तून इंग्रजांवर प्रखर टीका केली. या ‘गुन्ह्या’बद्दल इंग्रज सत्ताधीशांनी टिळक-आगरकरांवर खटला चालवून 101 दिवसांचा तुरुंगवास ठोठावला. दोघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा जामीन मागितला. टिळक-आगरकांकडे एवढे पैसे नव्हते. महात्मा फुले यांनी पुुण्यातल्या उरवणे सावकारांकडून ही रक्कम उभी केली. टिळक-आगरकर सुटून आल्यानंतर महात्मा फुले यांनी पुण्यात त्यांची मिरवणूक काढून जाहीर सत्कारही केला. टिळकांच्या अग्रलेखांमुळं इंग्रज पुढंही बिथरत राहिले. 1897 मध्ये पुण्यात प्लेगाची साथ होती. रॅन्ड या इंग्रज अधिकाऱ्यांनं पुण्यात उच्छाद मांडला. त्याच्या जाचाविरोधात टिळकांची लेखणी कडाडून चालली. चापेकर बंधुंनी या रॅन्डला गोळ्या घालून ठार केलं. टिळकांच्या ज्वलजहाल शब्दांनीच रॅन्डच्या खुनास प्रवृत्त केलं, असा निष्कर्ष काढून इंग्रजांनी टिळकांविरोधात भारताच्या इतिहासातला पहिला राजद्रोहाचा खटला भरला. लोकमान्यांना यात 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावरही पुन्हा लोकमान्यांची लेखणी जाळ काढतच राहिली. लोकमान्यांच्या पत्रकारितेवर प्रक्षुब्ध झालेल्या इंग्रजांनी 1906 मध्ये लोकमान्यांविरोधात दुसऱ्यांदा राजद्रोहाचा खटला भरला. पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी लोकमान्यांचं वकीलपत्र घेतलं होतं. अखेर लोकमान्यांना सहा वर्षांसाठी मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. संपादक लोकमान्य टिळकांच्यावर इंग्रजांनी एकूण तीनदा राजद्रोहाचा खटला भरला आणि प्रत्येकवेळी त्यांना तुरुंगवास झाला. पण लोकमान्यांची लेखणी अखेरपर्यंत म्यान झाली नाही. त्यांच्या शब्दांमुळं लंडनला हादरे बसतच राहिले.

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
”डॉ. आंबेडकरांएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तुत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीय माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही. भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भेळ ज्ञानोपासनेची परंपरा तितक्याच तपश्चर्येने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो. (हे वाक्य 1940 च्या दशकात लिहिलेलं आहे.) ज्या ज्या विद्वानांना आपल्या व्यवसायाचा आणि व्यासंगाचा अभिमान वाटत असेल त्यांनी बाबासाहेब ह्या ज्ञानयोग्याचे एकवार दर्शन घ्यावे म्हणजे त्यांचा तो वृथा अभिमान जिरुन जाईल. ज्या कोणी सनातनी ब्राह्मणाला आपल्या जन्मजात ब्राह्मण्याची घमेंड असेल त्याने ह्या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पाहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करुन नाही तो बाहेर पडला तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करु,” हे सांगितलं आहे थोर संपादक आचार्य प्र. के अत्रे यांनी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अगाध बुद्धिमता आणि विशाल विद्वत्ता यानं स्तिमीत होऊन जावं, अशी स्थिती आहे. पण संपादक-पत्रकार म्हणून बाबासाहेब लोकमान्यांइतकेच जहाल होते. लोकमान्यांची लेखणी इंग्रजांवर बरसली, बाबासाहेबांची लेखणी हिंदु धर्मातल्या अनिष्ट रुढी-परंपरांवर चालली. ‘मूकनायक’पासून सुरु झालेली डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता ‘बहिष्कृत भारत’, ‘समता’, ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकांमधून तळपत राहिली. समाजाच्या उतरंडीवर असलेल्या घटकांच्या न्यायासाठी, हक्कांसाठी कोणालाही शिंगावर घेण्याचे धारिष्ट्य डॉ. बाबासाहेबांकडे होते. बेदरकार वृत्ती, प्रचंड विद्वत्तेच्या माध्यमातून प्राप्त केलेला अधिकार आणि तर्कशुद्ध युक्तीवाद यामुळं बाबासाहेबांच्या वाट्याला जाण्याचं धाडस कोणी केलं नाही. ढोंग, व्यक्तीपूजा आणि परंपरांचं अंधानुकरण यावर बाबासाहेबांची लेखणी वीजेसारखी बरसत राहिली. बाबासाहेबांच्या पत्रकारितेमुळं शब्दशः कोटी, कोटी कुळं उद्धरली.

बाळशास्त्री, लोकमान्य आणि डॉ. बाबासाहेब यांच्या पत्रकारितेचे उद्देश भिन्न होते, पण एक साम्य तिघांमध्येही होतं.
ते म्हणजे यातल्या एकानंही लौकिकार्थानं पत्रकारितेचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. विद्यापीठात जाऊन पत्रकारितेची पदवी मिळवली नव्हती.
तरीही आजवरच्या मराठी पत्रकारितेतली ही तीन सर्वोच्च शिखरं आहेत मित्रांनो. यांच्यापेक्षा उंच काही नाही.
———————————–
आता वर्तमानात येऊ.

लॉकडाऊनमुळं पदवी परीक्षांचे निकाल अनेक ठिकाणी लांबले. काहींचे उशीरा लागले असतील. काहींचे लागण्याच्या बेतात असतील. पदवी हातात पडल्यानंतर पुढं पत्रकार होण्याचं स्वप्न तुमच्यातल्या अनेकांनी पाहिलं असेल. काहींना वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आदींमधून लिहायचं असेल. काहींना टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्यांमधून झळकण्याचं ग्लॅमर आकर्षित करत असेल. काहींना यु-ट्यूबच्या माध्यमातून स्वतःची न्यूज चॅनेल्स सुरु करायची असतील. इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल पोर्टल, ऑनलाईन नियतकालिकं सुरु करायची असतील. माध्यम कोणतंही असो. मुख्य काय तर लिहिण्याच्या किंवा बोलण्याच्या माध्यमातून इतरांना गोष्टी सांगणं, नवी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं याची आवड तुम्हाला असेल.

माझं सांगणं इतकंच आहे की, यासाठी पत्रकारितेचं शिक्षण-पदवी घेण्याची अजिबात गरज नाही. बाळशास्त्री, लोकमान्य, डॉ. आंबेडकर ही तर सर्वोच्च शिखरं झाली. पण त्यांच्याव्यतिरीक्तही मराठीतले अनेक ज्येष्ठ संपादक-पत्रकार असे आहेत ज्यांनी पत्रकारितेचं शिक्षण कोणत्याही कॉलेजात, विद्यापीठात घेतलेलं नाही तरी त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं.

यंदा पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला अजिबात प्रवेश घेतला नाही तरी चालतंय.

‘हे कोण टिकोजीराव, फुकट सल्ला देणारे’ अशी शंका एखाद्याला वाटू शकते. नव्हे वाटलीच पाहिजे. (प्रश्न पडतच नसतील तर पत्रकार होण्याची इच्छा याच क्षणी मोडीत काढलेली बरी.) थोडक्यात सांगतो.
मी मराठी पत्रकारितेत काम करतोय, त्याला आता काही महिन्यातचं दोन दशकं पूर्ण होतील.

तुमच्यातल्याच अनेकांप्रमाणं मीही ग्रामीण भागातून बी.एस्सी. (केमिस्ट्री) झालो आणि पत्रकारच व्हायचं, हाच एकमेव उद्देश धरुन पुण्याची वाट धरली. वडील कोरडवाहू शेतकरी, आई गृहिणी. सामान्य आर्थिक स्थितीतलं घर. तेव्हाच्या पुणे विद्यापीठाच्या (आताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) ‘रानडे इन्स्टिट्यूट’मधून पहिल्यांदा पत्रकारितेचा डिप्लोमा केला. नंतर मास्टर्ससाठी प्रवेश घेतला. पण तत्पुर्वीच प्रत्यक्ष कामाला लागल्यानं हे शिक्षण अपुरं राहिलं. गेल्या सुमारे दोन दशकांत केसरी, लोकसत्ता, लोकमत, सकाळ आणि दैनिक भास्कर या नामांकित वृत्तपत्र संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आजवरची संपूर्ण कारकिर्द मराठी दैनिकांमधलीच आहे. सध्या ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत सहसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळतो. पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुण मैत्रिणी-मित्रांना चार गोष्टी सांगण्यासाठी एवढी पात्रता पुरे असावी.

तर यंदा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा नाहीए.

विद्यापीठं आणि इतर संस्था त्यांची ‘दुकानं’ उघडतीलंच पण तुम्ही तिथं जायचं की नाही याचा निर्णय विचारपूर्वक घ्या मित्रांनो.

यंदा पत्रकारितेच्या शाळा-कालेजात कोणी जाऊ नये?
1) ज्यांना तातडीनं शिक्षण पूर्ण करुन स्वयंपूर्ण व्हायचं आहे, घरच्या काही जबाबदाऱ्या आहेत अशांनी यंदा पत्रकारितेच्या शाळा-कालेजात जाऊ नये.

2) शिक्षण पटकन पूर्ण करून चटकन एखाद्या पेपरात, च्यानेलात नोकरीला लागावं, अशी इच्छा बाळगणाऱ्यांनी यंदा पत्रकारितेच्या शाळा-कालेजात जाऊ नये.

3) कोणतंही आर्थिक पाठबळ नाही, घरची स्थिती सामान्य आहे, अशांनी यंदा पत्रकारितेच्या शाळा-कालेजात जाऊ नये.

मग यंदा पत्रकारितेच्या शाळा-कालेजात जावं कोणी?
1) ज्यांना नुसती पत्रकारितेच्या शिक्षणाची पदवी हवी आहे अशांनी.
2) ज्यांना दुसरीकडं कुठंच प्रवेश मिळत नसेल अशांनी.
3) ज्यांना इतर कोणत्याही विषयात गती नाही अशांनी.
4) सर्वात महत्वाचं म्हणजे पुढची चार-पाच वर्षें कोणत्याही पेप्रात, च्यानेलात नोकरी मिळाली नाही तर अजिबात फरक पडत नाही अशांनी.
5) युपीएससी, एमपीएससी वगैरे अनेक भरताडं एकाचवेळी करत असताना विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये जागा मिळेल, टाईमपास होईल वगैरे किरकोळ उद्देश ज्यांचे आहेत अशांनी.
6) माझ्यात एवढी अफाट गुणवत्ता आहे की, काळ कसाही असला तरी मला कोणताही पेपर, च्यानेल हसत-हसत कामावर घेईल असा दुर्दम्य आशावाद ज्यांच्यापाशी आहे अशांनी.

मी का सांगतो आहे असं?
1) मैत्रिणींनो आणि मित्रांनो…एकट्या पुण्यातून दरवर्षी सुमारे पाचशे जण पत्रकारितेची पदवी घेऊन बाहेर पडतात….आणि पुण्यातली सगळी दैनिकं, च्यानेलं, नियतकालिकं वगैरेंमध्ये सध्या काम करत असणाऱ्या एकूण श्रमिक पत्रकांराची संख्याही जवळपास तेवढीच आहे. हे झालं फक्त पुण्याचं. या शिवाय राज्यातल्या इतर अनेक शहरांमध्ये कमीअधिक फरकानं हीच स्थिती आहे. म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा आताच कितीतरी जास्त आहे. तथाकथीत विद्यापीठं-कालेजं ही वस्तुस्थिती अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांपुढं का मांडत नाहीत, हा प्रश्न नेहमी मला पडतो. खरं म्हणजे विद्यापीठांनी ही यादीच विद्यार्थ्यांना द्यायला हवी की, तुम्ही ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहात तोच अभ्यासक्रम यंदा राज्यातले इतके-इतके हजार विद्यार्थी पूर्ण करणार आहेत. ‘प्लेसमेंट रेट’ अमुक आहे, बेकारीचं प्रमाण तमूक आहे वगैरे. पण पवित्र शिक्षण क्षेत्रातही पारदर्शकता नाहीच.

2) लॉकडाऊनमुळं बिघडलेल्या अर्थकारणानं सध्या कार्यरत असलेल्या यच्चयावत दैनिकं, नियतकालिकं, च्यानेलं यांच्यातील पत्रकारांचे पगार कमी करण्यात आले आहेत. शेकड्यांच्या संख्येनं लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे. ही प्रक्रिया थांबलेली नाही. पुढची किमान दीड वर्षं या व्यवसायात पगारवाढ, बोनस, नव्या लोकांना चांगल्या पगारावर संधी यातलं काहीही घडणार नाही.

3) पत्रकारितेचं शिक्षण घेऊन पाच-पाच, दहा-दहा वर्षं झाली तरी लाजिरवाण्या मानधनात काम करण्याची नामुष्की ओढवलेले अनेकजण पुण्या-मुंबईत मी पाहतो आहे. महत्वाच्या दिवसांमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेत दिवस वाया घालवले, पण दुसरं कोणतंच स्किल, ज्ञान कमावलं नाही, त्यामुळं आता क्षेत्र बदलायचं म्हटलं तरी पर्याय नाही. त्यामुळं नाईलाजानं तुटपुंज्या पगारात रडतखडत दिवस काढणारे अनेकजण मी पाहतोय.

काय करावं मग?
बाळशास्त्री, लोकमान्य आणि डॉ. आंबेडकर यांची उदाहरणं देत लेखाची सुरुवात केली. त्यांच्याच नावांनी शेवट करतो. या थोरांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात, विषयांमध्ये प्रचंड ज्ञान संपादन केलं. बहुभाषिक झाले. अष्टपैलू झाले. त्यांच्या इतकी प्रतिभा दुर्मिळ असते. पण तुमच्या-माझ्यातल्या अनेकांच्या आवडीचे इतरही विषय असतील. कौशल्य असतील. जगात उभं राहण्यासाठी आवश्यक असं ज्ञान मिळवण्यात आताचे उमेदीचे दिवस खर्च करा. स्वतःच्या आवडीच्या विषयात स्वतःला इतकं झोकून द्या की त्यात तुम्ही सर्वार्थानं पारंगत व्हा. परदेशी भाषा शिका, कला आत्मसात करा, यंत्रं-शस्त्रं-तंत्राचा नाद धरा. म्हशी पाळा, कोंबड्या पाळा, शेती करा. वाट्टेल ते करा. मग त्यानंतरही लिहिण्याची, व्यक्त होण्याची, बोलण्याची उर्मी शिल्लक राहणार असेल तर मग तज्ज्ञ -एक्सपर्ट म्हणून पत्रकारितेची दालनं तुम्हाला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सहज उघडली जाऊ शकतात. पण कोणत्याही क्षेत्रात मुरून जाऊन त्यात तज्ज्ञ होण्याचा प्रयत्न करा.

तूर्त पत्रकारितेच्या शिक्षणात वर्षं वाया घालवावीत, असं कोणतंही उच्च ज्ञान सध्याच्या एकाही कालेजातून-विद्यापीठातून दिलं जात नाही, या माझ्या दाव्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवा.

धन्यवाद.
आपला
सुकृत करंदीकर
पुणे

ताजा कलम – मला स्वतःला स्पर्धक नको किंवा माझ्या पगाराला-नोकरीला टाच लागेल, या भीतीतून मी हे लिहिलं आहे अशी शंका जर कोणाच्या मनात एवढ सगळं वाचल्यानंतर आली असेल तर ‘देव तुमचं भलं करो. आपणास शुभेच्छा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading