रक्ताची गरज भागविण्याकरीता सोशल माध्यमांचा वापर व्हावा- सदाशिव कुंदेन
पुणे, दि. 29 – सोशल माध्यमांचा वापर तरुणाई विविध गेम्स खेळण्याकरीता व वेबसीरिज पाहण्याकरीता मोठया प्रमाणात करते. मात्र, हाच सोशल माध्यमांचा उपयोग रक्ताची गरज भागविण्याकरीता झाल्यास कळत नकळत मोठे सामाजिक काम युवा शक्तीकडून घडू शकते. रक्ताची गरज असणे किंवा रक्तदान शिबीरांची माहिती पोहोचविण्याकरीता ही माध्यमे जीवनदायिनी ठरु शकतात, असे मत रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते सदाशिव कुंदेन यांनी व्यक्त केले.

सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळ, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त फडके हॉल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सन्मान रक्तदात्यांचा गौरव समाजातील ख-या जीवनदात्यांचा याअंतर्गत सदाशिव कुंदेन यांना गौरविण्यात आले.
आमदार सुनील शेळके व अंकुश काकडे यांच्या हस्ते शिबीराचे उद््घाटन झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कासार, सूर्यकांत पाठक, राजेंद्र शिंदे, मुख्य आयोजक ओम कासार, रमेश होले, नीता परदेशी, सूरज लोखंडे, श्री कासार, विनोद लोखंडे, निखील साळवी, भरत पवार, सौरभ मेथे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल व स्वच्छता किट असे सन्मानाचे स्वरुप होते.
सदाशिव कुंदेन म्हणाले, उन्हाळ्यामध्ये मोठया प्रमाणात रक्ताची चणचण भासते. त्यामुळे याकाळात शिबीरांचे मोठया प्रमाणात आयोजन केले जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिबीरांचे आयोजन कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे अशी शिबीरे रक्ताची गरज भागविण्याकरीता उपयुक्त आहेत. मी देखील १०० हून अधिक वेळा स्वत: रक्तदान केले असून महाराष्ट्राच्या कानाकोप-यात रक्तदान शिबीरे भरविण्याकरीता प्रयत्नशील असतो.
ओम कासार म्हणाले, तरुणाने रक्तदान शिबीराच्या माध्यमातून आपले सामाजिक कर्तव्य बजावावे, याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना आणि साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज मोठी असून ही गरज भागविण्याकरीता आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत. शिबीरात १८४ बाटल्या रक्तदान झाले असून यापुढेही शिबीरे भरविण्याकरीता पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
