Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती  दांडेकर यांना जाहीर

मुंबई, दि. २४ – राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.

श्रीमती मधुवंती दांडेकर यांची संगीत नाटकांमधली कारकीर्द तब्बल ५५ वर्षांची आहे. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिजात शास्त्रीय व अभिजात मराठी संगीत नाटकांचा वारसा मिळालेल्या मधुवंती दांडेकर यांना गायनाची आवड लहानपणापासून होती. शालेय वयापासूनच त्यांनी गायन व नाट्य स्पर्धांमधून अनेक पारितोषिकं मिळवली होती. स्वरराज छोटा गंधर्व, संगीतभूषण पंडित राम मराठे, पंडित ए.के. अभ्यंकर, पंडित यशवंतबुवा जोशी यांसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. सुमारे 25 मराठी संगीत नाटकांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. तसेच गुजराती व उर्दू नाटकांतूनही त्यांनी काम केले. मधुवांतीताईंनी अनेक नामांकित संस्थांच्या नाटकात ज्येष्ठ कलावंतांबरोबर भूमिका केल्या. मधुवंतीताई आजही संगीत व नाट्यक्षेत्रात मोठया उत्साहाने व आस्थेने कार्यरत आहेत. शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल दांडेकर यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, श्रीमती रजनी जोशी, चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर, निर्मला गोगटे आणि विनायक थोरात यांना प्रदान करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading