fbpx
Saturday, September 30, 2023
MAHARASHTRA

स्वारातीला मिळणार १७ कोटी रुपये किमतीची ‘३.० टेस्ला एमआरआय मशीन’ !

बीड, दि. २४ : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याच्या बळावर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आता ‘१.५ टेस्ला’ ऐवजी आधुनिक ‘३.० टेस्ला एमआरआय मशीन’ खरेदीस मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक विकास योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती.मुंडेंनी दिली.

पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपययोजनांमध्ये कमालीचे सतर्क असून मागील महिन्यात त्यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून रखडलेली एमआरआय मशीनची मागणी मार्गी लागली होती. त्यावेळी ९ कोटी ५२ लक्ष रुपये किंमतीच्या १.५ टेस्ला क्षमतेच्या एमआरआय मशीन खरेदीस परवानगी देण्यात आली होती. मात्र ३.० टेस्ला क्षमतेची अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त टर्न की ट्रान्सफॉर्मर असलेली मशीन स्वारातीमध्ये मिळावी यासाठी मुंडे प्रयत्नशील होते.

‘३.० टेस्ला एमआरआय सिस्टीम टर्न की ट्रान्सफॉर्मर’ एकूण १७ कोटी ३२ लक्ष ५१ रूपयेच्या यंत्रसामुग्रीमुळे रुग्णांवर अतिशय आधुनिक तपासण्या अंबाजोगाई येथे होतील. याचा फायदा जिल्ह्यातील गरजू व गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात होईल व वैद्यकीय उपचारातील मोठ्या खर्चात बचत होणार आहे तसेच एमआरआय तपासणीसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याचेही आता टळणार आहे.

यापूर्वी राज्य शासनाने शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र शासनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या श्रेणीवर्धनासाठी मंजूर अनुदानातून ‘१.५ टेस्ला एमआरआय मशीन विथ टर्न की’ ही नऊ कोटी बावन्न लक्ष रुपयेची यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मान्यता दिली होती.

परंतु “३.० टेस्ला एमआरआय” या  आधुनिक यंत्रणेमुळे रुग्णांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही. या यंत्रसामुग्री खरेदी करण्यास आवश्यक असणारा अतिरीक्त निधी जिल्हा वार्षिक योजनेतर्गत उपलब्ध होणार असल्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता; हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून स्वाराती रुग्णालयात लवकरच ही अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त एमआरआय मशीन दाखल होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: