उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी तात्काळ फेरनिविदा काढा;अन्यथा तीव्र आंदोलन :आबा बागुल
पुणे दि. २४ – सद्यस्थितीत शहरात वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. जीवघेण्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांत बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे निविदा प्रक्रियेपर्यंत आलेल्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला [एच. सी. एम. टी. आर ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीचा मुद्दा उपस्थित करून लांबणीवर टाकण्याची भूमिका न घेता तात्काळ फेरनिविदा प्रक्रिया राबवावी अन्यथा पुणेकरांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

याबाबत काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांसह महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधीचा मुद्दा उपस्थित करून उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला लांबणीवर टाकण्याची भूमिका एकप्रकारे पुणेकरांना मृत्यूच्या खाईत लोटणारी अशीच आहे. मुळात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने एच. सी. एम. टी. आर प्रकल्प हा निधी नाही म्हणून रद्द करता येत नाही. जर रद्दच करायचा असेल तर तो विकास आराखड्यातच रद्द करायला पाहिजे होता. आजमितीस वेगवेगळ्या बाबींवर त्यासाठी दहा ते बारा कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तसेच भूसंपादनापोटी टीडीआर, एफएसआयही आणि पैसेही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे केवळ अलाइनमेंट बदलण्याच्या नावाखाली किंवा ९ मीटर रस्ते या भानगडीत न पडता आपण २४ मीटर या निकषानुसारच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी तसेच पालिकेच्या मुख्यसभेसमोर या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा होऊ द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेने विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे एकही रास्ता प्रत्यक्ष जागेवर रुंदीप्रमाणे नाही. त्यामुळे शहरामध्ये सगळी वाहतूक व्यवस्था व पायाभूत सुविधा कोसळल्या आहेत याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे. निधी नाही हे कारण देऊन पालिका प्रशासन पुणेकरांच्या हितासाठी महत्वपूर्ण असणारा हा प्रकल्प रद्द करू शकत नाही किंवा लांबणीवरही टाकू शकत नाही. निधीबाबत मार्ग काढणे सहजशक्य आहे. आज सहा हजार कोटी रुपयांचा असणारा हा प्रकल्प उद्या पन्नास हजार कोटी रुपयांवर पोहचवल्यावर निविदा काढणार का ? असा प्रश्नही आबा बागुल यांनी उपस्थित केला असून सर्व खात्यांची बैठक घेऊन उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार [एच. सी. एम. टी. आर] मार्गाबाबत फेरनिविदा तातडीने काढावी अन्यथा या चालढकल कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल तसेच न्यायालयातही दाद मागावी लागेल असा इशारा दिला आहे.