ट्रॅव्हल्सधारकांचे प्रशासनास साकडे निर्बंध उठवाःबस सेवेस मुभा द्या
परभणी, दि.8 – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च पासून ट्रॅव्हल्सधारकांची वाहतुक सेवा पूर्णतः ठप्प असून त्याचा मालकांसह चालक, क्लिनर तसेच कर्मचारी वर्गास मोठा आर्थिक तडाखा बसला आहे. अशा या स्थितीत प्रशासनाने तात्काळ निर्बंध हटवावेत, वाहतुक मुभा द्यावी, अशी मागणी जिल्हा खासगी बस मालक संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष महेश भुतडा, उपाध्यक्ष शिवाजीराव चाटे, उपाध्यक्ष ओंकार अंबिलवादे, सचिव शेख शमी शेख उस्मान, सहसचिव शिवाजीराव कोठुळे, गणेश जामकर, ललीत खुराणा, विवेक फुटाणे, नागेश निलावार, सुयोग अंबिलवादे, श्रीकांत पांपटवार, बालाजी झरकर आदीनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे काही मागण्या केल्या. बसमालक सर्वात जास्त टॅक्स भरत असतात. त्यामुळे किमान एक वर्षाचा टॅक्स माफ करावा, बसेसचा सहा महिन्याचा इन्शुरन्स कालावधी वाढून द्यावा, लक्झरी बस मालकांचा व्यवसाय तारण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, बँकाच्या कर्जावरील सहा महिन्याचे व्याज माफ करावे, चालक, क्लिनर,कर्मचा-यांना आर्थिक मदत करावी, इंधनावरचा अधिभार रद्द करावा, किमान एक वर्षासाठी टोल माफ करावा, जीएसटीत सुट द्यावी, बस कर्मचा-यांना कोरोना योध्दा घोषीत करून विमा संरक्षण द्यावे अशी या शिष्टमंडळाने केली.