fbpx
Monday, October 2, 2023
NATIONAL

देशातील वैद्यकीय सेवेला चालना देण्यासाठी चार स्तंभी धोरण जाहीर

नवी दिल्ली, दि. 1 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळूरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. कोविड-19 परिस्थिती हाताळण्यासाठी कर्नाटक सरकारने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

मोदी म्हणाले की, दोन जागतिक महायुद्धांनंतर आता संपूर्ण जगाला ह्या संकटाचा सामना करावा लागला आहे. जागतिक महायुद्धाच्या आधी आणि नंतर जसे संपूर्ण जगात बदल झाले तसेच कोविड च्या आधीच्या आणि नंतरच्या जगात देखील फरक असेल. मोदी म्हणाले की, कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या साहसी लढाईचे मूळ हे आमच्या वैद्यकीय समुदायाच्या आणि कोरोना योद्धयांच्या कठोर परिश्रमात आहे. त्यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तुलना  सैनिकांशी केली परंतु असे सैनिक ज्यांनी सैनिकांचा गणवेश परिधान केलेला नाही.

पंतप्रधान म्हणाले की, विषाणू हा अदृश्य शत्रू आहे परंतू आमचे कोरोना योद्धे हे अजेय आहेत आणि अदृश्य आणि अजेय यांच्यामधील या लढाईत आमचे वैद्यकीय कर्मचारी नक्कीच विजयी होतील. पंतप्रधानांनी जमावाच्या मानसिकतेमुळे आघाडीच्या कर्मचाऱ्यांसोबत घडलेल्या हिंसक घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले की, या सगळ्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. ते म्हणाले की, सरकारने या आघाडीच्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील दिले आहे.

जागतिकीकरणाच्या काळात आर्थिक मुद्द्यांवरील चर्चेऐवजी विकासाच्या मानवी केंद्रित बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. आरोग्य क्षेत्रात प्रगती करणाऱ्या देशांमध्ये आता पूर्वीच्या तुलनेत अधिक फरक पडेल आणि सरकारने गेल्या 6 वर्षात आरोग्य-सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात अनेक उपक्रम राबविले आहेत.पंतप्रधानांनी आरोग्य-सेवा, त्यातील पायाभूत सुविधा आणि ते प्रत्येकाला सहज उपलब्ध व्हावे यासाठी त्यात सुधारणा करण्यासाठी चार स्तंभी धोरण अवलंबण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, पहिला स्तंभ प्रतिबंधक आरोग्य सेवा असेल जिथे योग, आयुर्वेद आणि सामान्य स्वास्थ्य यांचे स्थान महत्त्वाचे असेल. ते म्हणाले, जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 40,000 हून अधिक कल्याण केंद्रे सुरू केली आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे यश हे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. दुसरा आधारस्तंभ आहे – परवडणारी आरोग्य सेवा. पंतप्रधानांनी आयुष्मान भारत – जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत एक कोटी लोकांना विशेषत: महिला आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना याचा कसा फायदा झाला, यावर पंतप्रधानांनी यावेळी प्रकाश टाकला.

तिसरा आधारस्तंभ म्हणजे- पुरवठ्यामध्ये सुधारणा. पंतप्रधान म्हणाले की भारतासारख्या देशात योग्य वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय शिक्षणाची पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे.ते म्हणाले, देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय किंवा पदव्युत्तर वैद्यकीय संस्था असेल हे सुनिश्चित करण्याच्या दिशेने काम सुरु आहे. देशामध्ये आणखी 22 एम्सची  स्थापना करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात आम्ही एमबीबीएसमध्ये 30,000 आणि पदव्युत्तर पदवीमध्ये 15,000 जागा समाविष्ट करू शकलो आहोत. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी वृद्धी आहे. संसदेच्या अधिनियमाद्वारे भारतीय वैद्यकीय परिषदेच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याबाबतही पंतप्रधानांनी माहिती दिली.

चौथा स्तंभ, ते म्हणाले की सर्व योजनांची मिशन मोड अंमलबजावणी होईल आणि चांगल्या कल्पनेच्या यशस्वीतेसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय पौष्टिक मिशनच्या अंमलबजावणीमुळे तरुणांना आणि मातांना कशी मदत होत आहे आणि 2030 च्या जागतिक लक्ष्याच्या 5 वर्षे आधी म्हणजे 2025 पर्यंत क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाचा भारताने निश्चय केला आहे हे देखील त्यांनी नमूद केले. त्यांनी मिशन इंद्रधनुष विषयीही सांगितले जेथे लसीकरणाच्या व्याप्तीमध्ये चार पटींनी वाढ झाली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने नुकतीच 50 हून अधिक विविध सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी नवीन कायदा आणण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे देशातील पॅरा-वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या कमतरतेची समस्या दूर होईल. त्यांनी उपस्थितांना, टेली-मेडिसिन क्षेत्रात प्रगती कशी करावी, मेक इन इंडियाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात नफा कसा मिळवायचा आणि आरोग्य सेवेमध्ये माहिती तंत्रज्ञान संबधित सेवांचा समावेश कसा करावा या तीन मुद्यांवर चर्चा करण्याची विनंती केली.

मेक इन इंडिया क्षेत्रामध्ये सुरुवातीच्या नफ्यात देशांतर्गत उत्पादकांनी पीपीई कीट आणि एन-95 मास्कचे उत्पादन करायला सुरुवात केले आणि त्यांनी 1 कोटींहून अधिक पीपीई कीट आणि 1.5 कोटींहून अधिक मास्क पुरवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत आरोग्यसेतू अॅप ज्याप्रकारे मदत करत आहे त्याचे देखील पंतप्रधानांनी कौतुक केले.

Leave a Reply

%d bloggers like this: