अण्णाभाऊंना लोकशाहीर ही उपाधी लावण्याआधी मी त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणेन – नंदेश उमप
पुणे, दि. 31 – अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही उपाधी लावण्याआधी मी त्यांना स्वातंत्र्यसैनिक ही उपाधी लावणे अधिक संयुक्तिक मानतो. आण्णाभाऊंनी त्यांच्या पोवाड्यांमधून डफलीवर थाप मारुन संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत क्रांतीचे जे रणशिंंग फुंकले त्याला तोड नाही, असे उद्गगार लोककलाकार आणि पार्श्वगायक नंदेश उमप यांनी व्यक्त केले.

आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दि सांगता समारंभानिमित्त आज संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार्श्वगायक नंदेश उमप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मनित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी उपमहापाैर सरस्वती शेडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, एनवायसीएमचे चेअरमन आणि समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, सचिन ईटकर, निकिता मोघे आणि पुणे विद्यापीठाच्या आण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डाॅ. सुनील भणगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर प्रसिद्ध संवादक मिलींद कुलकर्णी यांनी पार्श्वगायक नंदेश उमप यांचा लोककलेतील प्रवास गप्पांमधून उलगडून दाखविला.
नंदेश उमप त्यांच्या प्रकट मुलाखतीत विविध प्रश्नांची उत्तर देताना म्हणाले की, अण्णाभाऊंनी विपूल साहित्य निर्मितीद्वारे त्यावेळी समाजाला दिशादर्शनाचेच काम केले. आजही माझ्या सारख्या कलाकाराला आण्णाभाऊंचे पोवाडे सादर करतांना रोमांचीत व्हायला होते, ही त्यांच्या शब्दांचीच ताकद म्हणावी लागेल. अण्णाभाऊंच्या विचारांची खोली आणि द्विव्यदृष्टीचा अंदाज केवळ त्यांचे साहित्याचे वरवर वाचन करुन आपल्याला येणार नाही. अण्णाभाऊ आपल्यालाला पचवावे लागतील, रिचवावे लागतील तेव्हाच त्यांचा विचार आपणा पर्यंत पोहचेल. माझे बाबा विठ्ठल उमप आणि अण्णा यांच्यातील मैत्रीतील गोफ मी खूप जवळून अनुभवले आहेत. बाबांना एखाद्यावेळेस आण्णांच्या भेटीला जाणे न जमल्यास नायगांव पर्यंत बाबांच्या भेटीला अण्णा चालत यायचे.
कार्यक्रम आयोजनामागची भूमिका संवाद पुणेचे सुनिल महाजन यांनी विशद केली, तर समर्थ युवा फाैऊडेशनचे राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुणे मनपाचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर, उपमहापाैर सरस्वती शेंंडगे, सचिन ईटकर आदी मान्यवरांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केली.
हा कार्यक्रम करोनाच्या पार्श्वभुमीवर झाल्याने शासनातर्फे आखून दिलेल्या शासकीय नियमातच संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच सांस्कृतीक पुणेच्या फेसबुक, ईस्ट्राग्राम आणि यु-ट्युबवरुन देखील याचे प्रत्यक्ष प्रक्षेपण करण्यात आले.
