१२ आमदारांची नाही, महाराष्ट्राची काळजी करा; फडणवीसांचा सल्ला
मुंबई, दि. ५ – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून या सरकारच्या अस्थिरतेवर चर्चा सुरु झाल्या. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत राज्यातील सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या आहेत, असं म्हटलं. यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, संजय राऊतांच्या रोखठोक नंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सल्ला दिला आहे.

महाराष्ट्राचे ठाकरे सरकार पाडण्यात आम्हाला अजिबात रस नाही. ते अंतर्विरोधाने पडेल, असं फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलं. सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर विरोधी पक्षनेत्यांना हे शहाणपण सुचलं. सरकार पाडणार नाही, पण सरकारला अडचणीत आणण्याचे नवे प्रयोग सुरूच राहतील. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ जागा भरायच्या आहेत. या १२ जागांचे राजकारण आताच सुरू झालं आहे. सरकारने शिफारस केलेले १२ सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्या आहेत, असं राऊत म्हणाले होते. या विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी न करता महाराष्ट्राची काळजी करावी, असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. मला असं वाटतं की, संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी करू नये. त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी. त्यांनी कोरोना रुग्णांची काळजी करावी. ज्यांना उपचार मिळत नाही, अशा कोरोना रुग्णांचं काय होणार? असा प्रश्न त्यांनी विचारला असता तर मला अधिक आनंद झाला असता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
